सणांच्या दिवसांत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात वाढ

वसई-विरार महानगरपालिकेने सन २०१८ मध्ये शहरात प्लास्टिकवर बंदी आणली होती.

विरार :  करोनानंतर शहरात निर्बंध शिथिल झाल्याने सणांच्या निमित्ताने बाजारपेठा सजू लागल्या आहेत. नागरिकांची गर्दी वाढत आहे. पण त्याचबरोबर शहरात पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे.  सर्रास पिशव्यांचा वापर होत असल्याने शहराच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

शहरात बंदी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या चोरट्या मार्गाने वसई विरारमध्ये दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.  सणाचे दिवस असल्याने आणि करोना काळानंतर तब्बल दोन वर्षाने बाजारपेठा पूर्णत: खुल्या झाल्याने विक्रेतेसुद्धा ग्राहकांच्या मागणीला दुजोरा देत सर्रास या पिशव्या बाळगत आहेत. यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांपासून मोठ्या दुकानातसुद्धा प्लास्टिक पिशव्यांची रेलचेल पुन्हा दिसू लागली आहे.    

वसई-विरार महानगरपालिकेने सन २०१८ मध्ये शहरात प्लास्टिकवर बंदी आणली होती. त्यानंतर पालिकेने कडक कारवाई करत नागरिकांना कागदी कापडी पिशव्यांची सवय लागली होती. पण करोना काळात ही कारवाई थांबली असल्याने पुन्हा शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे.  सणाच्या निमित्त बाजारपेठेत हजारो फेरीवाले या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. त्याचबरोबर सणाच्या दिवसांत अनेक छोटे-मोठे घरगुती कार्यक्रम, मेजवान्या, पाहुणचार केला जातो. यामुळे आता प्लास्टिक कॅरीबॅग, थर्माकोल पत्रावळ्या, भाजी वा किराणा साहित्यासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या सर्रास मिळत आहेत. घरून कापडी पिशवी घेऊन जाऊन किराणा, भाजी वा अन्यसाहित्य आणण्याची सवयही जडली नसल्याने सगळीकडे प्लास्टिक पिशव्यांतूनच साहित्य आणण्याची पद्धत सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increased use of plastic bags during festive days akp

ताज्या बातम्या