विरार पश्चिमेला रुग्णालयाच्या प्रमुख रस्त्यावर रिक्षा थांबे 

विरार : विरार पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या आडमुठेपणामुळे भररस्त्यात रिक्षा थांबे बनवावे लागल्याने या परिसरात आता नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. या या परिसरात असलेल्या शहरातील एकमेव रुग्णालयाच्या प्रमुख रस्त्यावरच हे रिक्षा थांबे असल्याने रुग्णालयात जाण्यासाठी मार्ग न उरल्याने अनेक रुग्णांना वाटेतच आपले प्राण गमवावे लागत आहेत. शेकडो रिक्षा या परिसरात असल्याने हा परिसर शहरातील सर्वात जास्त कोंडीचा परिसर बनला आहे.

विरार पश्चिम येथील श्रेया हॉटेल ते विरार पश्चिम पोलीस चौकीपर्यंत असलेला रस्ता हा अरुंद  आहे. यात या रस्त्यावर आकाश मार्गिका टाकल्याने हा रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. रेल्वे स्थानकात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तसेच याच मार्गावर शहरातील प्रमुख दुकाने आहेत. तसेच रेल्वे स्थानकाच्या जवळ संजीवनी रुग्णालय आहे. या जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे.  यामुळे या मार्गावर शेकडो वाहने आणि हजारो नागरिक दररोज येजा करत असतात. यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. अनेक वर्षांपासून विरार रेल्वे स्थानकात रिक्षा थांबे आहेत. पण करोना काळात रेल्वेने यांना बंदी घातली होती. पण करोना चक्रानंतर रेल्वेने या रिक्षा चालकांना त्यांच्या संघटनांना विश्वासात न घेता या जागेत खासगी ठेकेदारला वाहनतळ म्हणून देऊन टाकले. यामुळे या परिसरात आता प्रवाशांच्या दुचाकी लावल्या जात आहेत.

या संदर्भात विविध पक्षाच्या सर्व संघटनांनी रेल्वेशी संपर्क साधून रिक्षा थांब्यांना परवानगी द्यावी, अशी विनंती केली पंरतु रेल्वेने त्याच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली.

त्यातही रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असल्याने आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच अरुंद होत जातो. या परिसरात शहरातील एकमेव मोठे संजीवनी रुग्णालय आहे.

यात दररोज शेकडो रुग्ण येत असतात पण या परिसरात रुग्णवाहिका जाण्यासाठी सुद्धा जागा नसल्याने अनेकांना रस्त्यातच आपले प्राण सोडावे लागले आहे.  यामुळे रेल्वेने पुन्हा रिक्षा थांब्यांना परवानगी देऊन कोंडी सोडवावी, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

अरुंद रस्त्यावर रिक्षा थांबे

 रिक्षांना इच्छीतस्थळी  परवानगी नाकारली. यामुळे नाईलाजाने रिक्षा चालकांना या अरुंद रस्त्यावर थांबे बनवावे लागत आहे. या ठिकाणाहून पष्टिद्धr(१५५)मेकडील डोंगरपाडा, बोळींज, आगाशी, अर्नाळा, विवा कॉलेज, शीतल नगर, गोकुळ टाऊनशिप, तिरुपती नगर, गोकुळ पार्क, म्हाडा कॉलनी, यशवंत नगर अशा सर्वच परिसरात रिक्षा जात आहेत. मोठय़ा वाहनांना या ठिकाणी वाहतुकीची परवानगी नसल्याने नागरिकांना रिक्षा शिवाय कोणताही पर्याय नाही. यामुळे शेकडो रिक्षा या परिसरात उभ्या असतात.

रेल्वेने रिक्षा चालक-मालक संघटनांना विश्वासात न घेता गुपचूप ठेकेदाराला ही जागा देऊन टाकली आहे. यामुळे गरीब रिक्षाचालकांची मोठी फसवणूक झाली आहे. रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर रिक्षा उभ्या कराव्या लागत आहेत. जे पैसे ठेकेदार रेल्वेला देतो ते पैसे रिक्षाचालक द्यायला तयार आहे. तरी रेल्वेने रिक्षाचालकांना जागा द्यावी

महेश देसाई, अध्यक्ष, विरार रिक्षा चालक-मालक संघटना