वसई: मिरारोड येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील ३ वर्षांपासून फरार आरोपीला गजाआड करण्यात हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-१ च्या पथकाला यश आले आहे. कासमअली मर्चंट असे आरोपीचे नाव असून, सोमवारी दिल्ली विमानतळ परिसरातून त्याला अटक करण्यात आली.
मिरारोड पूर्वेतील काशिमीरा परिसरातील ‘इंटरनॅशनल बेकरी’वर १३ ऑक्टोबर २०२३ रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निसार शेख याच्या सांगण्यावरून त्याचे साथीदार मुन्ना पठाण, अकबरअली शेख आणि इम्रान शेख यांनी बेकरीचे मालक इब्राहीम पटेल यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी हा कट रचला होता.घटनेच्या दिवशी आरोपी अकबरअली शेख हातात पिस्तुल घेऊन दुकानात शिरला आणि बेकरीत उपस्थित कर्मचाऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुल दाखवून २ ते ३ वेळा ट्रिगर दाबला. मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने आरोपी अकबरअली बाहेर दुचाकीवर वाट पाहत असलेल्या इम्रान शेख याच्यासोबत पसार झाला.
पोलिसांच्या तपासात आरोपी अख्तर मर्चेंट याने बेकरी मालक इब्राहीम पटेल यांना व्हॉट्सॲप कॉल करून निसार शेखच्या नावाने खंडणीची मागणी केली असल्याचे उघड झाले. या संघटित गुन्हेगारीमुळे सर्व आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर आरोपी अख्तर मर्चेंट हा फरार होता. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे १७ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्ली विमानतळ परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व अटक केली. सादर कारवाई पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस अंमलदार गणेश पाष्टे, विनोद राऊत, सुधीर खोत व धीरज मेंगाणे यांच्या पथकाने केली आहे.
