scorecardresearch

आठवडय़ाची मुलाखत : दीड वर्षांत भाईंदरला जादा पाणी!

मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात वेगवेगळे उपक्रम राबवून शहराला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

दिलीप ढोले, आयुक्त

मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात वेगवेगळे उपक्रम राबवून शहराला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शहरारातील करोना परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मीरा-भाईंदर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांचा राज्यपालांनी नुकताच सत्कार केला. स्वच्छता मित्र स्पर्धेत महाालिका राज्यात दुसऱ्या स्थानावर आली. अतिक्रमणविरोधी आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातही पालिकेने केलेली कारवाई गाजत आहे. याबाबत आयुक्त दिलीप ढोले यांच्याशी केलेली बातचीत..

 •   स्वच्छता मित्र चॅलेंज स्पर्धेत यश कसे मिळवले?

सफाई मित्रांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. सफाई कर्मचाऱ्यांची हाताने सफाई करण्याची कामे बंद करून यांत्रिकीकरणावर भर दिला. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिका राज्यात दुसरी आणि देशात नवव्या स्थानावर आली आहे.

 •   शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या?

मीरा-भाईंदर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू केले आहेत. स्च्छतेतील दिवाळी हा अनोखा उपक्रम सुरू केला होता. शहरात थुंकणाऱ्यांवर, अस्वच्छ करणाऱ्यांना थेट दंड आकारत आहोत. अशा व्यक्ती आढळल्यास पालिकेत तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. रिक्षा आणि वाहनांतून कुणी थुंकल्यास त्यांच्या छायाचित्रांवरून थेट त्यांच्या घरी जाऊन दंड आकारला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये एक जरब बसली आहे.

 •   करोना निवारणाच्या कामाची दखल शासनाने घेतली का?

करोना परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल राज्यपालांनी गौरव केला होता. करोना नियंत्रण, रुग्णालयांची सुरक्षितता आणि लसीकरणाची मोहीम याबाबत नगरविकास खात्याने ‘मीरा-भाईंदर पॅटर्न’चे कौतुक करून इतर महापालिकांना हे पॅटर्न राबविण्याचा सल्ला दिला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे.

 •   शहरातील पाणी प्रश्न कसा सोडविला?

शहरातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन सूर्या प्रकल्पातून २१८ दशलक्ष लिटर पाणी शहरात आणण्याचा प्रस्ताव होता. आ. गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने त्याचा पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४१३ कोटींच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली आहे. या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पुढील दीड वर्षांत मीरा-भाईंदरच्या नागरिकांना अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे.

 •   शहर फेरीवालामुक्त करण्यासाठी काय योजना आहेत?

अनधिकृत फेरीवाले ही समस्या सर्व महापालिकांना भेडसावत असते. आम्ही यासाठी विशेष पथक तयार करून कारवाई सुरू केली आहे. दोन वेळा आमच्या पथकांवर हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र त्याला न जुमानता आम्ही कारवाई सुरू ठेवली आहे. पदपथ फेरीवालेमुक्त करणे, अतिक्रमणे हटविणे हे माझे ध्येय आहे. या मोहिमेला यश येत आहे. याशिवाय शहरातील अनधिकृत बांधकामेदेखील जमीनदोस्त केली जात आहे. नुकतेच आम्ही शहारातील दोन डान्स बारवर कारवाई करून ते पाडले आहेत.

 •   करोना काळात आलेल्या आर्थिक संकटावर कशी मात करणार?

करोनावर नियंत्रण मिळवले मात्र हे करताना पालिकेला स्वनिधीतून १२५ कोटी रुपयांचा खर्च आला. राज्य शासनाकडून भरपाई म्हणून केवळ १९ कोटी ४० लाख मिळाले. त्यामुळे १०५ कोटींची तूट होती. विविध मार्गांनी उत्पन्न वाढविणे सुरूच होते. विकासकामांना निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेच्या बँकेतील ठेवींवर १०० कोटींचा धनाकर्ष घेण्याचा निर्णय महासभेकडून मंजूर करवून घेतला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत.

 •   मालमत्ता कराची विक्रमी वसुली कशी केली?

शहराचा विकास करायचा तर त्यासाठी निधी हवा. त्यासाठी नियोजनबद्ध आखणी केली. त्यामुळे यंदा मालमत्ता कराचे उत्पन्न हे ९० कोटींवर गेले आहे. मागील वर्षी ते केवळ ७ कोटी होती. अग्निसुरक्षा कराचे अपेक्षित उत्पन्न १२ कोटी होते ते २५ कोटी एवढे वाढवले आहे.

 •   करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत ?

आम्ही यापूर्वीही शहरातील करोनावर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे शहरात रुग्णांचे हाल होऊ दिले नव्हते. आता प्राणवायूबाबत सक्षम झालो आहोत. शहरात २० मेट्रीक टनचे दोन स्वतंत्र प्रकल्प तयार आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी क्षमतेच्या तीन पट प्राणवायू निर्मितीची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे तिसरी लाट आली तरी आम्ही त्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत.

 •   प्रदूषणमुक्त शहरासाठी काय योजना आहेत?

प्रदूषण रोखण्यासाठी तसचे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पालिकेने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) या योजनेअंतर्गत २१ कोटींचा निधी मिळवला आहे. शहरात विविध ठिकाणी हवामान गुणवत्ता यंत्रे बसविण्यात येणार आहे. याशिवाय प्रदूषण रोखण्यासाठी विद्युत वाहने खरेदी केली जाणार असून वीज बचतीसाठी पालिकेत सौर ऊर्जा यंत्रणा बसवली जाणार आहे.

 •   अंपगांसाठी काय विशेष योजना राबविल्या?

अपंगांच्या विविध कल्याणकारी योजनांची शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. अपंगासाठी पेन्शन योजना सुरू केली असून त्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्षांत या योजनेअंतर्गत ५४५ अपंगांना ६३ लाखांहून अधिक रकमेची पेन्शन अदा केले आहे. आम्ही अपंगांना ई-ऑटो रिक्षाचे वाटप नुकतेच केले आहे. अपंगांसाठी आर्थिक मदतीबरोबर स्वंयरोजगाराच्या योजना तयार केल्या आहेत.

 •   शहराला पर्यटनासाठी कसे विकसित करणार?

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात भाईंदरच्या उत्तन येथील ‘जंजिरे धारावी’ या किल्ल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. या स्मारकाचा विकास केला जाणार आहे. स्मारक परिसराच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यात चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक असे स्वरूप आहे. शहरातील ते एक मानाचे स्थान ठरणार आहे.

 •    नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडविता?

सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही कारभार करत असतो. नागरिकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी सकाळी प्रभात फेरीच्या वेळी ‘टॉक विथ कमिशनर’ असा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे जनतेशी थेट संवाद साधता येतो

 •   पुढच्या योजना काय आहेत?

मीरा-भाईंदर शहराला केवळ सोयीसुविधा देणे हा उद्देश नाही तर शहराची एक आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पालिकेतील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने विविध योजना राबवून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

–  मुलाखत : सुहास बिऱ्हाडे

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interview excess water corona period ysh