वसई – पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल दरम्यान वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे डांबरआणि इतर बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा मोठा परिणाम शहरातील विकासकामांवर झाला आहे. वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली रस्ते विकासाची कामे रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
वसई विरार शहरा पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणच्या भागात रस्त्याची निर्मिती, जलवाहिन्या अंथरण्याची कामे, रस्त्यांचे पचवर्क अशी विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी कामे सुरू होऊन अर्धवट अवस्थेत राहिली आहेत. पावसाळा येण्याआधी ही विकासकामे मार्गी लागली पाहिजे असा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून इराण- इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे.
या युद्धामुळे कच्च्या तेलाचा मोठाउत्पादक असलेल्या इराण देशाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात ‘ब्रेंट क्रूड’च्या दरात मोठी वाढ झाली आहे. डांबर हे कच्च्या तेलाचे उपउत्पादन असल्याने त्याच्या दरात देखील वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम आता शहरातील विकास कामांवर होऊ लागला आहे.
डांबराचं असं आहे की त्याच्यातनं जे काही रॅा मटेरियल येतं, त्याचाच इफेक्ट झाल्यामुळे जवळपास किंमती २३ ते २४ हजार वाढल्यात. या आठवड्यात आता १४ हजार रुपये वाढलेत. त्यामुळे ठेकेदाराला देखील विकास कामे करणे खर्चिक वाटायला लागलेला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश कामांची गती कमी झाली असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले आहे. नवीन कामाला पुढे येत नाहीत कॉन्ट्रॅक्टर, कारण त्यांना देखील भीती वाटते की युद्ध अजून किती लांबेल आणि काय फरक होईल. त्यानंतर गॅस सिलेंडरचं म्हणा किंवा इंधनामुळे देखील परिणाम झाला आहे.
विकासकामांना ‘ब्रेक’ लागण्याची भीती
पावसाळा तोंडावर असल्याने सध्या शहरात रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, डांबराचा तुटवडा आणि वाढलेले दर यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर आगामी काळात रस्ते दुरुस्ती आणि नवीन प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
युद्धामुळे विकास कामांवर परिणाम होत आहे ही सत्य परिस्थिती आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीची जी आवश्यक कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने टप्प्यात टप्प्याने नियोजन केले जात आहे. – अजीव पाटील, महापौर वसई विरार महापालिका
