वसई: धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये केवळ आईस्क्रीम खरेदीचे बिल मागितल्याने मुंबईतील एका व्यवसायिकाला आणि त्यांच्या नातेवाईकाला पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मितेश शहा हे प्रवासी जखमी झाले आहेत.याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलिसांनी तीन पॅन्ट्री कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांनी आरोपींना केवळ नोटीस बजावली आहे.
मितेश शाह हे आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसह विक्रमगड आलोट १८ मे राजी रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. या प्रवासा दरम्यान पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी ३० रुपयांना एक आईस्क्रीम विकत घेतले होते. या दरम्यान शाह यांनी आईस्क्रीमच्या पाकिटावर ‘नॉट फॉर सेल’ (विक्रीसाठी नाही) असे छापलेले पाहिले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांकडे खरेदीचे बिल मागितले. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र, शाह यांनी बिल देण्याचा तगादा लावल्याने, “बिल देतो, आत या,” असे सांगून कर्मचाऱ्यांनी शाह आणि त्यांच्या नातेवाईकाला पॅन्ट्रीकारच्या आत बोलावले.
आम्ही आत जाताच ८ ते १० पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे दरवाजे आतून बंद केले. त्यानंतर त्यांनी आमच्यावर थेट हल्ला चढवला. आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच स्वयंपाकाच्या जड भांड्यांनी मारले. इतकेच नव्हे तर चालत्या ट्रेनमधून खाली फेकून देण्याची धमकीही त्यांनी दिली असल्याचे शाह यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. या झालेल्या मारहाणीत शहा हे गंभीर स्वरुपात जखमी झाल्याने त्यांनी तात्काळ आपत्कालीन साखळी (चेन) खेचून ट्रेन वसई स्थानकावर थांबवली. मात्र, तिथे त्यांना बोरिवली स्थानकात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. शेवटी शाह यांना उपचारासाठी कांदिवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी मितेश शहा यांच्या तक्रारीवरून वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात पॅन्ट्रीमधील तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले आहे.
