भाईंदर :-भाईंदरमधील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याचा २८८ वा विजयदिन महापालिकेने मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने गडप्रेमी उपस्थित होते.भाईंदरच्या उत्तन भागात ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ला आहे. चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून लढून हा किल्ला मराठा साम्राज्यात आणला होता. यासाठी आठ वेळा युद्ध करण्यात आले होते.

अखेर नवव्या वेळी, म्हणजे ६ मार्च रोजी, किल्ला जिंकण्यात त्यांना यश आले. त्यामुळे हा दिवस किल्ल्याचा विजयदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा २८८ वा विजयोत्सव मिरा भाईंदर महापालिकेकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी जंजिरे धारावी किल्ला जतन समितीने कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांच्या हस्ते आई धारावी देवीची पूजा करून करण्यात आली. त्यानंतर किल्ल्याच्या बालेकिल्ला स्थळी बसविण्यात आलेल्या नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ मूर्तीला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर समुद्र तटी असलेल्या बुरुजाजवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसिद्ध लोककलाकार पूजा सावंत यांच्या ‘शिवगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य व वक्तृत्वाच्या कलाकृती सादर केल्या.या कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष हसमुख गेहलोत, विरोधी पक्षांचे गटनेते जय ठाकूर तसेच इतर नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.