वसई: वसई पूर्वेतील वालीव औद्योगिक वसाहतीत उद्योजकावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, वसईतील कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये पर्यटकाने मद्याच्या नशेत हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विरार पश्चिमेच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळंब समुद्रकिनारी ‘तुलसी रिसॉर्ट’ आहे. मंगळवारी रात्री भिवंडी येथून काही पर्यटक या रिसॉर्टमध्ये आले होते. तिथे त्यांची मद्याची पार्टी सुरू असताना, अतिउत्साहाच्या भरात एका पर्यटकाने बेकायदेशीर गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. गस्तीवर असलेल्या अर्नाळा पोलिसांच्या बीट मार्शलला गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला रिसॉर्टमधील उपस्थितांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला; मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे गोळीचे काडतूस सापडले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत हवेत गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले. संदेश गुरव (३२) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो भिवंडी येथील बिल्डींग मटेरियल सप्लायर आहे.
तो आपल्या मित्रांसोबत रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी आला होता. आरोपी संदेश गुरव याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. वापरण्यात आलेले पिस्तूल बेकायदेशीर असल्याने आरोपीने ते नेमके कुठून आणले, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
