वसई: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामण-भिवंडी रस्त्याचे काम वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ठेकेदाराच्या नियोजित कामात सातत्य नसल्याने या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, आता तयार केलेला नवीन रस्ता दबल्यामुळे तो पुन्हा उखडण्यात आला आहे. या वारंवार होणाऱ्या ‘शस्त्रक्रियेमुळे’ स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

वसई पूर्वेच्या भागातून चिंचोटी कामण – भिवंडी असा २२ किलोमीटरचा राज्य महामार्ग गेला आहे. ठाणे, भिवंडी यासह अन्य भागांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग आहे. याच रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना ही वाढल्या आहेत. धोकादायक अवस्थेत असलेल्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. याशिवाय विविध आंदोलने ही केली होती. याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने टप्प्या टप्प्याने या चिंचोटी ते भिवंडी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र या कामाच्या दरम्यान नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे.

​कामण आश्रमशाळेच्या पुढे भिवंडीच्या दिशेला जाणारा रस्ता नुकताच तयार करण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जा किंवा तांत्रिक चुकीमुळे हा रस्ता एका बाजूने दबला गेला. परिणामी, हा रस्ता आता पुन्हा तोडण्यात आला आहे. वारंवार रस्ता बनवणे आणि तो पुन्हा उखडणे याचा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे, तिथे काम करण्याऐवजी चांगल्या ठिकाणी खोदकाम केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

​रस्ता वारंवार खोदल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. तसेच अर्धवट सोडलेली कामे आणि रस्त्यावरील अडथळ्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ​”ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला दररोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत. नवीन रस्ता दबतोच कसा? हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा. अशी मागणी नागरिक करीत आहेत.