भाईंदर :-काशिमीरा परिसरात नाल्यात मृतावस्थेत आढळलेल्या चार वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ पोलिसांनी उलगडले असून, हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुलाच्या आईच्या प्रियकराने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काशिमीरा येथील नीलकमल नाका परिसरात मंगळवारी सकाळी एका नाल्यात चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मुलगा नाल्यात पडून मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटल्याने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला.तपास अधिकारी महाजन यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने मृतदेह शवविच्छेदनासह न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपासादरम्यान हा मृत्यू अपघाती नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी मुलाच्या आईचा प्रियकर शंभू शर्मा उर्फ ‘नेपाळी’याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत असताना सोमवारी दुपारी आपण मुलाला मारहाण केल्याचे आरोपीने सांगितले. ही घटना मुलाच्या आईसमोर घडली होती. मात्र त्यानंतर दोघे झोपून गेल्यावर रात्री मुलाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. घाबरून जाऊन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलाचा मृतदेह जवळील नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली आहे.

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चिमुकल्यामुळे त्याला मुलाच्या आईसोबत एकांतात वेळ घालवता येत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. तसेच मुलगा वारंवार रडत असल्याने संतापाच्या भरात त्याने मारहाण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी, मुलाची आई आणि मृत चिमुकला हे सर्वजण बेघर असून कचरा वेचण्याचे काम करत होते. काशिमीरा उड्डाणपुलाखालील परिसरात ते वास्तव्यास होते. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.प्रामुख्याने या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि कशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी एकत्रपणे केला.