वसई: काशिमिरा येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. पप्पू पेजर हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होऊन परदेशात राहत होता.

१३ ऑक्टोबर २०२३ ला काशिमिरा येथील इंटरनॅशनल बेकरीमध्ये कामावर असलेल्या कर्मचाऱ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान हा गुन्हा संघटित गुन्हेगारी टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलमांचाही समावेश करण्यात आला होता. यात तीन आरोपींना अटक ही करण्यात आली होती. मुख्य आरोपी हा फरार झाला होता.

पप्पू पेजर हा परदेशात लपून बसला होता. तो ११ मार्च रोजी मुंबई विमानतळावर उतरणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विमानतळावर सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीवर यापूर्वी वडाळा आणि भायखळा पोलीस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.