Virar Vadodara Route / वसई : विरार-सूरत-बडोदा विभागात प्रवासी सेवांसाठी स्वदेशी बनावटीची कवच ४.० ही रेल्वे सुरक्षा प्रणाली शुक्रवारी कार्यान्वित करण्यात आली. पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांच्या हस्ते २०९०७ या दादर – भूज सयाजी नगरी एक्सप्रेस गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही गाडी मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली एक्सप्रेस ठरली आहे. कवच प्रणाली कार्यान्वित होणे हे पश्चिम रेल्वे नेटवर्कवर प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

कवच प्रणाली ही विरार-सूरत-बडोदा विभागाच्या ३४४ किमी अंतराच्या मार्गावर कार्यान्वित करण्यात आली आहे आहेत. ४९ स्थानके, ५७ रेडिओ कम्युनिकेशन टॉवर्स आणि सुमारे ७०० किमी ऑप्टिकल फायबर केबलच्या सहाय्याने या मार्गावर कवच प्रणाली लागू करण्यात आली आहे.

आधीच कार्यान्वित झालेल्या विभागांव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेच्या इतर अनेक विभागांवर २६६७ मार्ग किलोमीटरवर कवच प्रणालीच्या कामासाठी अंदाजे १४३५ कोटी रुपये खर्च केला जात आहे. तसेच २४७६ किमी मार्गावरील कामाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून पश्चिम रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. तसेच याच वर्षात विरार ते मुंबई सेंट्रल दरम्यान कवच प्रणाली सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे, पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी सांगितले आहे.

कवच प्रणाली म्हणजे काय? (Rail Safety India)

कवच प्रणाली

कवच प्रणाली ही भारतीय रेल्वेची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश सुरक्षितता वाढविणे हा आहे. ही स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली असून, रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ही प्रणाली रेल्वेची समोरासमोर (हेड-ऑन) किंवा मागून (रिअर-एंड) धडक होण्यापासून वाचवू शकते.

या प्रणालीमध्ये सिग्नलची माहिती / गती मर्यादा / हालचालीचा अधिकार यांचे ऑनबोर्ड डिस्प्ले, समांतर रस्ता फाटकावर (एलसी गेट) आपोआप शिट्टी वाजणे, गती मर्यादित ठिकाणी गाडीचा वेग नियंत्रित करणे ही वैशिष्ट्ये आहेत. कवच प्रणालीच्या या वैशिष्ट्यांमुळे प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल.

‘या’ मार्गावरही कवच प्रणाली कार्यान्वित (Train Protection System)

डिसेंबर २०२५ मध्ये पश्चिम रेल्वेने बडोदा -अहमदाबाद विभागात कवच प्रणाली कार्यान्वित केली होती. विरार-बडोदा विभाग कार्यान्वित झाल्यामुळे, आजपर्यंत पश्चिम रेल्वेवर एकूण ४३५ मार्ग किलोमीटरवर कवच प्रणाली कार्यान्वित झाली आहे.

कवच तंत्रज्ञान ही एक प्रगत आणि किफायतशीर रेल्वे सुरक्षा प्रणाली आहे. तसेच ही सुरक्षा प्रणाली आत्मनिर्भर भारताचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.