वसई-विरार शहराला धरण टप्पा २ मधून दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

वसई : बहुचर्चित खोलसापाडा धरण- २ च्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. वन खात्याकडून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या दिवाळीत या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. खोलसापाडा धरण टप्पा क्रमांक २ मधून वसई-विरार शहराला दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी मिळू शकणार आहे.

 सध्या वसई -विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून दशलक्ष लिटर, सोबत सूर्या टप्पा-३  मधून १०० दशलक्ष लिटर्स, उसगाव धरणातून २० आणि पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तूटही मोठी आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नाही. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन पालिकेने खोलसापाडाची दोन्ही धरणे विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात खोलसापाडा धरण-२  हे  विकसित केले जाणार आहे. हे धरण लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे खात्यामार्फत ही पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. या कामाचा एकूण खर्च ५२ कोटी रुपये एवढा आहे. पालिकेने या धरणाच्या कामाला सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती.

या खोलसापाडा- २ धरणाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले होते. त्यातील मुख्य अडसर हा वन खात्याचा होता. खोलसापाडा धरणाच्या धरणाचे पाणलोट क्षेत्र वन खात्याच्या जागेत    आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि ६ लाख झाडांचे वनीकरण करण्याची अट होती. यासाठी वन खात्याला १२ कोटी रुपयांचा मोबदला द्यायचा होता. याशिवाय अनेक तांत्रिक अडचणी होत्या. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि वन खात्याला १२ कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले. याशिवाय मार्गावर ६ हजार ८७५ झाडे कापण्यासाठी ९ लाख ३२ हजार रुपयेदेखील देण्यात आले आहे. यामुळे खोलसापाडा -२ धरणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.   वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाख झाली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित आराखडय़ात पुढील २० वर्षांत  शहरातील लोकसंख्या ४५ लाख एवढी होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने भविष्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पर्यायी स्रोत शोधणे सुरू केले होते. एमएमआरडीएमार्फत देहरजी धरणाचे काम केले जाणार आहे.  तर दुसऱ्या ठिकाणी राजावली, तिल्हेर आणि सातिवली या ठिकाणी साठवण तलाव तयार केले जाणार आहेत. 

काय आहे खोलसापाडा धरण?

वसई-विरार शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण वसई तालुक्यातच असल्याने शहराला सर्वात जवळ असणारे हे धरण आहे. खोलसापाडा धरण- १ आणि खोसलापाडा धरण- २ अशी एकूण दोन धरणे आहेत. दोन्ही धरणांमधून शहराला ७० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन मिळणार आहे. त्यापैकी धरण १ मधून ५० दशलक्ष लिटर आणि धरण-२ मधून २० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी महानगरपालिकेची असणार आहे. धरणातील १०० टक्के पाणी महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. खोलसापाडा धरण १ चा खर्च ११४ कोटी रुपये आहे तर खोलसापाडा धरण २ चा खर्च ५२ कोटी रुपये एवढा आहे. खोलसापाडा धरण २ चे काम अडीच वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.

वसई-विरार शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आम्ही पाण्याचे नियोजन करत आहोत. खोलसापाडा टप्पा२ च्या मार्गातील सर्व अडथळे पूर्ण करण्यात यश आले आहे. दिवाळीत या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. लवकरात लवकर या धरणाचे काम पूर्ण करून घेतले जाईल.

हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई