वसई:- वसई-विरार शहरातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. उभारण्यात येणाऱ्या खोलसापाडा धरणाचे पाणी शहरापर्यँत ६८ दशलक्ष लीटर क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महापालिकेने जाहीर सूचना प्रसिद्ध करत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. सद्यस्थितीत शहराला सूर्या योजनेच्या धामणी व कवडास , उसगाव , पेल्हार या तीन धरणातून २३० दशलक्ष लीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा मंजूर केला आहे त्यापैकी १७० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन होतो. वाढती लोकसंख्या आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तूटही मोठी आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत असतात.
सध्याची व भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने खोलसापाडा धरण प्रकल्प १ व २ विकसित करण्याचा निर्णय घेतला असून खोलसापाडा २ चे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या धरणाचे काम ही प्रगतीपथावर आहे. या दोन्ही धरणातून प्रतिदिन ६८ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. धरणापासून शहरापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने योजना आखली असून त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकल्प ‘शहरी आव्हान निधी’ (अर्बन चॅलेंज फंड) कार्यक्रमांतर्गत शासनाच्या सहकार्याने विकसित केला जाणार आहे. या योजनेच्या वित्तपुरवठ्यासाठी आणि उभारणीसाठी महापालिकेने पात्र गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, बँका, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या तसेच पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील नामांकित कंपन्यांकडून ‘स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव’ (ईओआय) मागवले आहेत. हा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ही १० जुलै निश्चित करण्यात आली आहे.
नागरिकांना दिलासा मिळणार
वसई विरार शहरातील अनेक भागांना आजही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जर हे अतिरिक्त ६८ दशलक्ष लीटर पाणी शहरात आले तर ग्रामीण भागातील गाव पाडे, शहरी भागातील नागरी वस्त्या, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक आस्थापना यांना पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
