वसई: वसई-विरार शहरातील तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या खोलसापाडा-२ धरणाच्या कामाला आता वेग आला आहे. या प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला असून, हा प्रकल्प लवकरच सेवेत येणार आहे. यामुळे शहराला प्रतिदिन २२ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.

​शहराचे झपाट्याने झालेले नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या यांमुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. सद्यस्थितीचा विचार केला तर शहराला विविध स्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. यात ​सूर्या (धामणी व कवडास), उसगाव आणि पेल्हार धरण यातून २३० दशलक्ष लीटर, एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्प योजनेतून १८५ दशलक्ष लीटर मंजूर पाण्यापैकी १७० दशलक्ष लीटर असा एकूण ४०० दशलक्ष लीटर प्रतिदिन होत आहे. ​कागदावर ४०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असला, तरी जुन्या जलवाहिन्या आणि तांत्रिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते. परिणामी, वाढत्या लोकसंख्येला हे पाणी अपुरे पडत असून शहराच्या अनेक भागांत अद्यापही पाणीटंचाईची गंभीर समस्या कायम आहे.

​​या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने खोलसापाडा येथील १ आणि २ अशी दोन धरणे विकसित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात खोलसापाडा धरण-२ चे काम सुरू करण्यात आले. पालिकेने सप्टेंबर २०१८ मध्ये या कामाला मंजुरी दिली होती, मात्र वनखात्याच्या परवानग्या आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प दीर्घकाळ रखडला होता. अखेर शासनाकडे पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर करण्यात आले आणि कामाला गती मिळाली. ​१३५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

नुकताच महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सुद्धा धरणाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला असून विहित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे खोलसापाडा १ धरण प्रकल्पातून ही ४८ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे असेही पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून खोलसापाडा धरण विकसित केले जात आहे. या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात असून, हा प्रकल्प लवकरच पूर्ण करून शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा निर्धार आहे. असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

जलकुंभ उभारणीची कामे प्रगतीपथावर

या पाण्याचे विविध ठिकाणच्या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने जलकुंभ उभारले आहेत. सद्यस्थितीत पालिकेचे ४७ आणि ५२ गावांचे असे जलकुंभ आहेत. परंतु वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता ते ही अपुरे पडत आहेत. यासाठी शासनाच्या अमृत २ या योजनेतून दहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.उभारण्यात येत असलेले जलकुंभ हे दीड ते दोन दश लक्ष लीटर (एमएलडी ) क्षमतेचे आहेत. यात सनसिटी दिवाणमान, तुळींज, राजहंस चुळणे, आचोळे (पार्किंग लॉट) विरार कुंभारपाडा येथील जलकुंभ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहेत. अन्य गडगापाडा, कारगिल नगर, सेंट्रल पार्क, बिलालपाडा, धानिव, स्टार सिटी जूचंद्र या ठिकाणी सुद्धा मातीचे नमुने तपासणी झाली असून लवकर कामाला सुरुवात केली जाणार आहे. या जलकुंभामुळे आजूबाजूच्या परिसराला पाणी वितरण करण्यास मोठी मदत होणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.