वसई: वसई-विरार शहर महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत झालेला कथित घोटाळा आता ६४ कोटींवरून १०० कोटींच्या पार जाण्याची शक्यता असल्याचा दावा भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. मंगळवारी या प्रकरणी वसई-विरारचा दौरा करत महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

वसई विरार मध्ये घनकचरा प्रक्रियेतील ‘आरडीएफ’ सिमेंट कंपन्यांना न पुरवता बनावट कागदपत्रांच्या आधारे ३७.६६ कोटी रुपयांची देयके लाटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेने दाखल केलेली ही तक्रार म्हणजे केवळ प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ३७ कोटी रुपये खात्यात जमा झालेल्या मुख्य कंपनीवर अद्याप कोणतीही कारवाई का नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

​सोमय्या यांनी विरार येथील बोळींज पोलीस ठाण्याला भेट देऊन सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाये यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीत पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असलेला हा तपास अधिक वेगाने व्हावा, यासाठी हे प्रकरण तात्काळ राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली.

​यानंतर सोमय्या यांनी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची भेट घेतली. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी फक्त कंत्राटदारांपुरती मर्यादित न ठेवता, यात सहभागी असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

एसआयटी व ईडीकडून चौकशीची मागणी

​या प्रकरणाची विशेष तपास पथक आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी व्हावी यासाठी पत्र पाठवून तक्रार दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. तसेच, या घोटाळ्यातील लाभार्थी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे मान्य केले असून, वसई-विरार महापालिकेला भ्रष्टाचारमुक्त आणि माफियामुक्त करेपर्यंत केंद्रीय व राज्य यंत्रणांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा इशारा भाजपने दिला आहे.