वसई:- ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी )संचालक मंडळ निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर वसई- विरारमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा असलेल्या सर्वपक्षीय ‘सहकार’ पॅनलने २१ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी विरार येथील कार्यालयात जाऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी पूर्वी पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले होते. बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून ‘परिवर्तन पॅनल’ जाहीर करण्यात आले होते. मात्र, या पॅनलविरोधात शिंदे यांची शिवसेना, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

यात सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत विजय मिळविला. मात्र सहकार पॅनलच्या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना परिवर्तन आणि सहकार अशा दोन्ही पॅनलमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे या महायुतीचे उमेदवार जिंकले असून महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात ही उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

११ जुलै चेअरमन पदाची निवड

​येत्या ११ जुलै रोजी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा चेअरमनपदाची निवड होणार आहे. या निवडीच्या तोंडावर विरारमध्ये राजकीय नेत्यांची ये-जा लक्षणीय वाढली आहे. आमदार किसन कथोरे यांच्या भेटीपूर्वी, त्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती.

सहकार पॅनलच्या विजयात बहुजन विकास आघाडीची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ११ जुलैला होणाऱ्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत नेमकी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन निवडीपूर्वी विविध पक्षांच्या बड्या नेत्यांनी घेतलेल्या या भेटींमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.