वसई: महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विरारमध्ये कोकण सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोकण विभागातील १५० महिला बचतगट सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान ‘कोकण सरस २०२६’ या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विरार पश्चिम येथील जकात नाका भागातील म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे हा मेळावा दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. कोकणची अस्सल खाद्यसंस्कृती, ग्रामीण हस्तकला आणि महिला स्वयंसहायता समूहांच्या (बचत गट) कर्तृत्वाचा संगम आता नागरिकांना अनुभवता येणार आहे.

या मेळाव्यात कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील महिला बचत गटांचा सहभाग असणार आहे. १५० स्टॉल्सपैकी पालघर जिल्हा परिषदेचे ६०, वसई-विरार महानगरपालिकेचे ५०, आणि इतर कोकण जिल्ह्यांचे ४० स्टॉल्स असणार आहेत. या स्टॉल्सवर घरगुती मसाले, वारली चित्र, हस्तकला वस्तू, कापडी पिशव्या आणि बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

तसेच या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे ‘सिंधुदुर्ग ते मोखाडा’ या पट्ट्यातील खाद्यपदार्थ. प्रदर्शनात ३० स्टॉल्स खास खाद्यपदार्थांसाठी असून, तिथे उकडीचे मोदक, घावणे, रस-शिरवाळे, कोंबडी-वडे, नाचणीची भाकरी आणि पुरणपोळी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे.

“ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे,” अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली. तर, वसई-विरारमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

तर कोकण सरस प्रदर्शनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत मैदानाचे सपाटीकरण, स्टॉल्स बांधणे ही कामे अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी छत्रसिंग राजपूत यांनी दिली आहे.