अवजड वाहने व विश्रांतीची वाहने मुख्य मार्गावर
वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने विश्रांतीसाठी,आपत्कालीन परिस्थिती वाहने ये जा करण्यासाठी पुरेसे सेवा रस्ते नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी नव्याने सेवा रस्ते विकसित करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता.
यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ही तयार केला आहे. मात्र अजूनही कामे सुरू होत नसल्याने सेवा रस्ते रखडलेलेच आहेत. त्याचा परिणाम हा महामार्गावर दिसून येत आहे.
मुंबईहून थेट गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा सर्वात जास्त वर्दळीचा आणि महत्वाचा मानला जातो. अलीकडच्या काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र महामार्गावरील आवश्यक प्राथमिक सोयीसुविधा नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा सेवा रस्ता (सर्विस रोड )असणे आवश्यक आहे.सद्यस्थितीत जे सेवा रस्ते आहेत ते सुद्धा अपुरे असून त्या रस्त्यावर माती भराव, बांधकामा दरम्यान निघालेला राडा टाकून दिला जात आहे.
त्यामुळे विश्रांतीसाठी वाहने ही थेट महामार्गावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे तीन पदरी असलेली वाहिनी अरुंद होते. त्यामुळे वर्सोवा पुलापासून ते विरार फाटा या दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते.
काही वेळा मध्येच अशी वाहने उभी असल्याने अपघात ही घडत आहेत. यासाठी सेवा रस्ते आधी विकसित करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाने शक्य असेल त्या ठिकाणी सेवा रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही सेवा रस्ते तयार न झाल्याने समस्या कायम राहिली आहे.
वसई विरार महापालिकेच्या हद्दीत केवळ दुतर्फा मिळून केवळ २५ किमी इतका सेवा रस्ता आहे. तर पालघर पर्यँत दुतर्फा मिळून ८५ किमी इतकाच सेवा रस्ता मिळतो त्यातही अडचणी आहेत असे महामार्गा प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वसई विरार मधील १० ते १२ किलोमीटरचे विकसित केले जाणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या केबलचे अडथळे….
वसई विरारच्या भागातून गेलेल्या महामार्गाच्या बहुतांश भागात महावितरणने विद्युत वाहिन्या टाकल्या आहेत. मात्र बहुतांश भागातील विद्युत वाहिन्या या दोन फूट खोदून टाकल्या आहेत तर काही वाहिन्या या वरचे वर आहेत. त्यामुळे कामे करताना अडचणी येत असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. याबाबत आम्ही महावितरणला ही सूचना दिल्या आहेत. त्यांनी जर ही काळजी घेतली तर नक्कीच कामे जलदगतीने मार्गी लागतील असेही त्यांनी सांगितले आहे.
ट्रक टर्मिनलचा अभाव
राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षापासून अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. विश्रांतीसाठी व आपत्कालीन परिस्थिती वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनल नसल्याने वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत आहेत. हीच वाहने वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहेत. यासाठी ट्रक टर्मिनल तयार करण्याचे विचाराधीन आहे.यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जागा दिल्यास त्याठिकाणी टर्मिनल तयार करण्यासाठी प्रयत्न करू असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
