नवीन आचोळे पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची कमतरता ; नागरिकांना माहिती नसल्याने गोंधळ

या आचोळे पोलीस ठाण्याअंतर्गत ३ पोलीस चौक्या असून त्यांना देखील मनुष्यबळ नसल्याची तक्रार येथील पोलिसांनी केली आहे

वसई: नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आचोळे पोलीस ठाण्याला पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे. दुसरीकडे आचोळे आणि तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दींची माहिती नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडू लागला आहे.

पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून ‘मीरा -भाईंदर वसई विरार’ या नव्या पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी वसई-विरार शहरात वसई, माणिकपूर, वालीव, नालासोपारा, तुळींज, अर्नाळा सागरी अशी सहा पोलीस ठाणी होती. मात्र वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यंचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आणखी चार नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात बोळींज, पेल्हार, आचोळे आणि मांडवी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यापैकी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्याचे विभाजन करून आचोळ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. एव्हरशाईन येथे हे पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी या नव्या पोलीस ठाण्याचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले होते. मात्र या पोलीस ठाण्याला मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे.

आचोळे पोलीस ठाण्याअंतर्गत दिड लाख लोकसंख्या आहे. धार्मिक स्थळांची संख्या जास्त असल्याने हे पोलीस ठाणे संवेदनशील मानले जात आहे. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ मंदिरे, ३ चर्चेस, १० मशिदी, ४ पुतळे आणि १ गुरूद्वारा आदींचा समावेश आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस ठाण्यापुढे आहे. परंतु नवीन पोलीस ठाण्याला मनुष्यबळाची कमतरात भेडसावू लागली आहे. या पोलीस ठाण्यासाठी दोन पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक, ४ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि ६० कर्मचारी देण्यात आले आहे. मात्र यापैकी अनेक अधिकारी हजरच झालेले नाहीत. ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, जे दिर्घकालीन रजेवर आहेत, अशा अधिकार्यांची नियुक्ती या नव्या पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे या जागा अद्याप रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. या आचोळे पोलीस ठाण्याअंतर्गत ३ पोलीस चौक्या असून त्यांना देखील मनुष्यबळ नसल्याची तक्रार येथील पोलिसांनी केली आहे. रात्रीच्या वेळी गस्तीसाठी देखील मनुष्यबळ नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मोठी लोकसंख्या असल्याने पोलिसांवर कामाचा ताण आहे. पंधरा दिवसातच या पोलीस ठाण्यात ३० गुन्ह्यंची नोंद झाली आहे.

हद्द निश्चितीबाबत संभ्रम

आचोळ्याची निर्मिती तुळींज पोलीस ठाण्याचे विभाजन करून झालेली आहे. ढोबळ मनाने डोंगराच्या पलिकडे तुळींज आणि  अलीकडे आचोळा अशी विभागणी झाली आहे. मात्र आपण कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो याची नागरिकांना माहिती नसल्याने  गोंधळ होत आहे. अनेकांना तक्रार देण्यासाठी तुळींज आणि आचोळा अशी पायपीट करावी लागते.  लवकरच आम्ही हद्दीचे फलक लावून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवू असे आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात सरोदे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lack of manpower in the new achole police station zws

Next Story
चंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी
ताज्या बातम्या