वसई: वसई पूर्वेच्या तुंगारेश्वर पर्वतावरील महादेवाच्या मंदिरातही दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येत्या १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी तुंगारेश्वर देवस्थान सज्ज झाले आहे.
वसई पूर्वेच्या सातीवली येथील तुंगारेश्वर पर्वतावर पुरातन महादेवाचे मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी मोठ्या संख्येने भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात. मध्य रात्रीपासूनच येथे दर्शनासाठी सुरुवात होते. या उत्सवाच्या निमित्ताने देवस्थानाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी मंदिराची सजावट करण्यात येत आहे. तर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भाविकांसाठी ये-जा करण्याचा मंदिराकडील रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे, पार्किंग व्यवस्था, आरोग्य पथक, खाद्यपदार्थ व्यवस्था करण्यात आली आहे. तर याठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या आणि चेंगराचेंगरी सारखे प्रकार घडू नयेत म्हणून देवस्थानचे स्वयंसेवक, पोलीस कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी तैनात आले असून गर्दीच्या नियोजनासाठी बॅरिगेटिंगही करण्यात आली आहे.
तसेच महापालिका अधिकारी, महावितरणचे कर्मचारी, तुंगारेश्वर देवस्थान समितीचे सदस्य, वाहतूक विभागाचे अधिकारी, फेरीवाले यांची संयुक्त बैठक पार पडली असून प्रत्येक विभागाला विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी तुंगारेश्वर देवस्थानात केल्या जाणाऱ्या महापूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी वसई विरारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना या पूजेचा मान दिला जातो. तर यंदा महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आणि प्रांताधिकारी शेखर घाडगे यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे आणि त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाणार असल्याची माहिती तुंगारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आणि नगरसेवक रमेश घोरकना यांनी दिली आहे.
पोलीस प्रशासन सज्ज
तुंगारेश्वर पर्वतावरील महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त वसई, पालघरसह विविध ठिकाणांहून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. या गर्दीच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वाहतूक विभागाकडूनही वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहीती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली आहे.

