वसई : केंद्र सरकारने २९ जुन्या कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहिता आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करार यांच्या विरोधात कामगार आणि शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. वसईतही भारताचा मार्क्सवादी – लेनिनवादी पक्षाच्या (लालबावटा) वतीने वसई तहसील कार्यालयात जोरदार निदर्शने करण्यात आली.

देशातील कामगार आणि शेतकरी संघटनांनी गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर भारत बंदची हाकही देण्यात आली आहे. मागील वर्षी २९ कामगार कायदे रद्द करून त्याजागी सरकारने चार कामगार संहिता लागू केल्या आहेत. पण, सरकारच्या या नव्या धोरणाचा कामगार संघटनांनी निषेध केला आहे.

सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितांमुळे कामगारांना गुलामीचे जीवन जगावे लागणार असून त्यांची सामाजिक व आर्थिक सुरक्षा पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. जनतेला न्याय देणारे जुने कायदे मोडीत काढून जनतेवर अन्याय करणारे आणि गुलामी लादणारे नवे कायदे आणले गेले आहेत. तसेच रोजगार हमीचा कायदा मोडीत काढून विबी ग्राम जी सारखा प्रतिगामी कायदा लागू करण्यात आला आहे, असे मत कामगार संघटनांनी व्यक्त केले आहे.

तर शेतकरी संघटनांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करारामुळे अमेरिकेतील स्वस्त कृषी उत्पादने भारतीय बाजारपेठेत येतील आणि त्याचा थेट फटका भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

देशभरात सुरू असणाऱ्या या संपाचे पडसाद वसई तालुक्यातही उमटल्याचे पहायला मिळाले. आज वसई तहसील कार्यालयासमोर लालबावटा पक्षाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह आंदोलन पुकारले होते. यावेळी ६० ते ७० आंदोलकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते.

केंद्र आणि राज्य सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे मोडीत काढून नवे कायदे लागू केले आहेत. या नव्या कामगार संहितेविरोधात आज आम्ही निदर्शन केले आहे. देशभरातील कामगार संघटना, कर्मचारी संघटना आणि ५०० शेतकरी संघटना आज या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सरकारला या संघटनांपुढे सरकारला झुकावे लागेल, अशी प्रतिक्रिया लालबावटा पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी शेरू वाघ यांनी दिली. तसेच आज यासंबंधी आम्ही तहसीलदारांना निवेदन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.