विरार : एका शाळेने शैक्षणिक देयक (फीस) वसुलीसाठी चक्क वकिलाकडून पालकांना नोटीस बजावल्या आहेत. राज्यात ही पहिलीच घटना असावी, या नोटीस मध्ये जर देयक नाही भरले तर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई पश्चिम एव्हर शाईन परिसरात असलेल्या सेंट फ्रान्सीन हाईस्कूलने करोना काळात पासून शैक्षणिक देयक बाकी असलेल्या अनेक विद्यर्थ्यांच्या पालकांना वकिलाच्या मार्फत नोटीस बजावल्या आहेत. देयक वसूल करण्यासाठी शाळेने हा नवा पायंडा पडण्याचा प्रकार लावला आहे. या नोटीस मध्ये शाळेने पालकांना चक्क दम देवून सात दिवसाच्या आत पैसे भरण्याचे सांगितले आहे. जर पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करत मुलांना शाळेतून काढून टाकले जाईल आणि त्यासाठी पूर्णत: पालक जबाबदार असतील असे सांगितले.
यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने माहिती दिली की, करोना काळापासून अनेक मुलांची वार्षिक शैक्षणिक देयक बाकी आहेत. करोना काळात शाळेने मुलांना विविध शैक्षणिक सुविधा दिल्या. त्यात ऑनलाईन वर्ग, परीक्षा, तसेच शाळेच्या अप्लिकेशन वरून पूर्णवेळ शाळा घेतली. यामुळे शिक्षकांचा, कर्मचारम्य़ांचा पगार आणि इतर खर्च कसा काढायचा यामुळे जर पालकांनी पैसे नाही भरले तर शाळा कशी चालेल? अशी माहिती शाळेने दिली. तर पालकांनी मात्र शाळेच्या विरोधात सूर लावत करोना काळ संपला असला तरी अनेक पालक त्याच्या आर्थिक परिणातून सावरले नाहीत. यामुळे पालकांनी शाळेला देयकात सुट तसेच हप्तय़ाची मागणी केली. पण शाळेने एकही रुपया कमी केला नाही. आता वसुलीसाठी वकिलातर्फे नोटीस बजावून पालकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरु आहे.
या संदर्भात वसई शिक्षण विभागाला माहिती विचारली असता त्यांनी यासंदर्भात कोणतीही तRार आली नाही. शासनाकडून करोना काळात पालकांची आर्थिक स्थिती खालावल्याने सर्व शाळांना १५ टक्के वार्षिक शैक्षणिक देयकात सूट देण्याचे सांगितले होते. त्याच बरोबर कोणतीही सक्ती न करता देयक वसूल करण्याचे आदेश दिले होते. केवळ देयक भरले नाही म्हणून कोणत्याही मुलाला शाळेतून काढता येत नाही. यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.
या संदर्भात मला माहिती नाही, शाळा व्यवस्थापनाने काही नोटीस बजावल्या आहेत, त्याची संपूर्ण माहिती घेवून सांगितले जाईल. -ममता भट, मुख्याध्यापक, सेंट फ्रान्सीन हाईस्कूल

पालकांनी या संदर्भात तक्रार विभागाकडे करावी, या संदर्भात वरिष्ठांची चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल, केवळ देयक भरले नाही म्हणून कुणालाही शाळेतून काढता येत नाही.- माधवी तांडेल, गट शिक्षण अधिकारी, वसई

शाळेने चालवलेला प्रकार चुकीचा आहे, कोणत्या पालकांना मुलांना त्रास झालेला आवडेल, करोना काळात अनेक पालक आर्थिक अडचणीत आले आहेत त्यांची स्थिती अजूनही सुधारली नाही, शाळेने पालकांचा सहानभूतीने विचार करून सवलत आणि हप्ते देवून सहकार्य करावे. -स्वप्नील शिर्शेकर, पालक