भाईंदर – मराठी भाषेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, अमराठी नागरिकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) शाखेत विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शाखांमध्ये बाराखडी व इतर भाषाशिक्षणाची पुस्तके ठेवण्यात येणार आहेत.
अलीकडेच मराठी भाषा सक्तीप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी मिठाई विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे, तर मराठीसाठी कायदा हातात घेतल्याच्या घटनांवर शासनानेही निषेध नोंदवला आहे. परिणामी, मीरा-भाईंदर शहराची प्रतिमा राज्यभरात मलीन होत आहे.
या पार्श्वभूमीवर, शहराची प्रतिमा सुधारावी आणि अमराठी नागरिकांमध्ये मराठी भाषेबद्दल सन्मान व आदर निर्माण व्हावा, यासाठी शिवसेनेने मोफत मराठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये शाखांमध्ये बाराखडीसह मराठी भाषेबाबत संपूर्ण माहिती देणारी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमामुळे भाषेवरून निर्माण होणारा द्वेष कमी होऊन, विविध प्रांतांतून आलेल्या नागरिकांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास परिवहन मंत्री शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
“मीरा-भाईंदर हे शहर आकाराने लहान असले तरी येथे राहणारे नागरिक शांतताप्रिय आहेत. परप्रांतातून आलेल्या नागरिकांनाही मराठी भाषेबद्दल आदर व सन्मान आहे. त्यामुळे मराठी भाषेवरून उद्भवणारा वाद नष्ट करण्यासाठी शिवसेना शाखांमध्ये बाराखडी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे,” -प्रताप सरनाईक – परिवहन मंत्री