शुक्रवार सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तूरळक प्रमाणात पाऊस पडला अशातच कामन गावात एका घरावर वीज कोसळल्याची घटना समोर आली आहे. यात घरातील २ मुली घाबरून धसका घेतल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

हवामान खात्याने येणाऱ्या तीन दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान शुक्रवार सकाळपासून शहरातील वातावरण ढगाळ झाले होते. आणि ढगांचा कडकळाट सुरू होता. काही भागात किरकोळ पाऊस पडला होता. कामन येथिल बेलकडी गावात राहणाऱ्या धर्मा सावरा यांच्या घरावर दुपारी १२ च्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन वीज कोसळली. यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घराच्या छताचा पत्रा फाटला असून घरात वीजेचे शॉक सर्कीट झाले. यात काही उपकरणे सुद्धा खराब झाली. स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळाटी पाहणी करून पंचनामा केला आहे. ही घटना घडली यावेळी सावरा यांच्या मुली घरात होत्या. त्या घाबरल्याने त्यांना तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असल्याची माहिती वसईच्या तहसिलदार उज्वला भगत यांनी दिली.