वसई- ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी मारू आत्महत्या केली. अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर त्याचा मृतदेह आढळला.

सपन पटेल (२७) हा तरुण गुजराथ जिल्ह्याच्या वापी येथे राहतो. २ सप्टेंबरला तो आपल्या दुचाकीने मुंबईत जाण्यासाठी निघाला होता. मुंबईत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र तो घरी परतला नसल्याने त्याचा शोध सुरू होता. दरम्यान त्याच्या घरात त्याने लिहिलेली एक चिठ्ठी त्याच्या कुटुंबियांना आढळली. त्यात ऑनलाईन जुगारामुळे १५ लाखांचे कर्ज झाल्याने मी आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. ती चिठ्ठी वाचून कुटुंबियांना धक्का बसला आणि त्यांनी वापी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वापी पोलीस त्याचा शोध घेत होते.

हेही वाचा – महापारेषणच्या ५० एमव्हीए रोहित्रात बिघाड, वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर परिणाम

हेही वाचा – वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण

दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रात पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा मृतेदह सपन पटेलचा होता. त्याची दुचाकी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली होती. वैतरणा खाडीत त्याने उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह वाहून अर्नाळा समुद्रकिनारी आला होता, अशी माहिती अर्नाळा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिंगारे यांनी दिली.