वसई : ऐतिहासिक वसई किल्ल्याची दिवसेंदिवस पडझड होत चालली आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळू लागले असून तटबंदीचे दगड निखळून पडत असल्याचे दिसत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास किल्ला नामशेष होईल अशी  भीती दुर्गप्रेमी, पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. या किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी दुर्गप्रेमीसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यापाराच्या दृष्टीने वसईचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी सन १५३६  मध्ये वसईचा किल्ला बांधला होता. किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले असून तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला ११० एकर परिसरात उभा आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. किल्ल्याला चारही बाजूंनी ३० फुटांची तटबंदी आहे. आता ही तटबंदी ठिकठिकाणी कोसळू लागली आहे. तटबंदीवर जंगली झाडे उगवली असून त्याची मुळे खोलवर रुतली आहेत. डागडुजी होत नसल्याने तटबंदी आणि बुरूज ढासळू लागले आहे. त्यामुळे किल्ल्यात येणारे दुर्गप्रेमी, र्पयटक आणि अभ्यासक हळहळ व्यक्त करत आहे. वसईचा किल्ला हे वसईकरांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. मात्र त्याची डागडुजी होत नसल्याने किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. एकेक करून हा समृद्ध वारसा नष्ट होत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. किल्ल्याचा एकूण विकास करण्यासाठी केंद्राने शंभर कोटींच्या निधीची तरतूद करून किल्ला वाचवला पाहिजे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. या वसई किल्ल्याचे संवर्धन झाल्यास ते महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

More Stories onवसईVasai
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local citizens demand for provision of 100 crores for the conservation vasai fort zws
First published on: 04-02-2023 at 12:55 IST