वसई विरार शहरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यात महावितरणच्या कर्मचाऱ्याचा ही समावेश आहे. या घडलेल्या दोन्ही घटनांमुळे वसई विरार शहर हादरले आहे. अशा घटनांमधून ही महावितरण कोणताच धडा घेत नाही. महावितरणचा हाच निष्काळजीपणा आता नागरिकांच्या जिवावार बेतू लागला आहे असेच काहीसे चित्र दिसून येत आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या भागाला महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जातो. वीज वितरण करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी विद्युत खांब, रोहित्र, विद्युत वाहक तारा, डीपी बॉक्स यांचा विस्तार केला आहे. याशिवाय नव्याने तयार होणाऱ्या इमारती, चाळी यासह अन्य भागात ही विस्तार सुरूच आहे. सद्यस्थितीत शहरातील दहा लाखाहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. अलीकडेच विजेच्या मागणीत वाढ होत आहे. परंतु वीज ग्राहकांना
वीज वितरण करण्यासाठी लावण्यात आलेली यंत्रणा सुरळीत आहे किंवा नाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने वीज विषयक समस्या कायम आहे. यात अनेक ठिकाणी उघडी रोहित्र, लोंबकळत्या वीज तारांमधून बाहेर उडणाऱ्या आगीच्या ठिणग्या, उघड्या वीज पेट्या, गंजलेले विद्युत खांब अशा समस्या आहेत.
विशेषतः सुरक्षित व सुरळीत वीज पुरवठा या गोष्टीला महावितरणने प्राथमिकता द्यायला हवी परंतु दोन्ही गोष्टींच्या बाबतीत महावितरणचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्याचाच प्रत्यय अपघातासारख्या घटनांमधून येत आहे. या निष्काळजीपणाने महावितरणच्या तारतंत्री कर्मचाऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक यांचा बळी गेला आहे.
नुकताच ३० मे रोजी विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे वीज रोहित्र दुरुस्तीचे काम करताना जयेश घरत या महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर २४ मे रोजी वसईच्या मर्सेस येथे महावितरणची विद्युत तार शेतात तुटून पडली होती. त्यात २२ वर्षीय सूरज कुमार याला जीव गमवावा लागला. तर त्यानंतर वसईच्या देवतलाव येथे विद्युत खांबातून वीज प्रवाहित दोन दुभत्या मेंढ्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी सुद्धा शहरात चिमुकल्यासह अन्य नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सातत्याने अशा घटनां समोर येत आहेत. मात्र महावितरण आपली वीज वितरण व्यवस्था सुधारणा करण्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. खरे तर अशा घटनांमधून महावितरणने यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी विशेष उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे होऊन केवळ काही दिवस मोहीम राबवून नागरिकांच्या मनाचे समाधान करायचे मात्र त्यानंतर जैसे थे परिस्थिती यातून साध्य काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महावितरणने शहरात वीज वितरणाचे अंथरलेले जाळे सुरक्षित आहे किंवा नाही याची जबाबदारी महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी घ्यायला हवी. याशिवाय जेथे संभाव्य धोका आहे त्या ठिकाणी दुरुस्ती, आवश्यक उपाययोजना, सूचना फलक अशा सर्व बाबींची पूर्तता केली तरच विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटना टाळता येतील.
सुरक्षा साधना विना दुरुस्तीची कामे…..
वसई विरार शहरात वादळी वारे, अतिभार व तांत्रिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. वीज समस्या निर्माण झाल्यानंतर त्या दुरुस्तीची कामे शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच खासगी एजन्सीकडून नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली जातात.
मात्र वीज दुरुस्तीचे काम करताना त्यांना आवश्यक ती सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा महावितरणचे वीज दुरुस्ती करणारे कर्मचारी सुरक्षा साधनाविनाच दुरुस्तीची कामे करीत असतात असे विविध घटनांमधून अधोरेखित झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात विविध कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते अशा वेळी वीज दुरुस्तीचे कामांसाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते अशा वेळी योग्य ती सुरक्षा संसाधने सोबत नसल्याने दुर्घटना घडत आहेत. यासोबतच अनेकदा महावितरण कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात ही योग्य रित्या समन्वय साधला जात नाही त्याचा ही फटका कर्मचाऱ्याचा बसत असल्याचे निदर्शनास आले आहे.महावितरण कडून नेहमी कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण दिल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात कर्मचारी दुरुस्ती कामे करताना त्यांनी सुरक्षा साधने घातली आहेत किंवा नाही याची वरिष्ठ स्तरावरून पाहणी होत नाही. त्यामुळे सुरक्षेसाधनाविनाच कामे होतात. त्याचा ही परिणाम दिसून येत आहे.
…केवळ संकल्प नको अंमलबजावणी हवी
महावितरणचा नुकताच सुरक्षा सप्ताह व वर्धापन मोठ्या उत्साहात पार पडला. वसई विरार शहरात ही मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालये येथील बाईक रॅली, जनजागृती अशा मोहिमा घेण्यात आल्या आहेत. दरवर्षी वीजेच्या धक्क्याने बळी जाण्याचे प्रकार घडतात. अलीकडेच अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.यंदाच्या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ‘ शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ अशी एक वेगळी संकल्पना मांडत शून्य अपघाताचा संकल्प केला आहे.
असा संकल्प जरी कागदोपत्री चांगला वाटत असला तरीही त्याची प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी वितरण व्यवस्था सुरळीत करणे, लोंबकळत्या वीज वाहक तारा काढून त्या भूमिगत करणे, वीज पेट्या बंदिस्त करणे, दुरुस्ती कामे करताना सावधानता बाळगणे, रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसविणे, नागरी वस्तीत व रहदारीच्या मार्गावर असलेल्या वीज यंत्रणेच्या ठिकाणी सुरक्षा वाढविणे, एखादी वीज घटना घडल्यास तातडीने लक्ष केंद्रित करणे अशा विविध प्रकारच्या उपाययोजनांची गरज आहे. म्हणून केवळ संकल्प नको तर कृती हवी तरच वीज दुर्घटनांना पायबंद घालण्यात यश येईल.