मच्छीमार बांधव हवालदिल

वसई : वातावरणातील लहरीपणाचा  फटका शेतकऱ्यांपाठोपाठ आता मच्छिमार बांधवांनाही बसू लागला आहे. रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर सुकविण्यासाठी लावण्यात आलेली मासळी पूर्ण पणे पावसाच्या पाण्याने भिजून गेली असल्याने  सुक्या मासळीची विक्री करणाऱ्या मच्छिमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवर्षी ऑक्टोबरपासून वसईच्या विविध भागातील समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मासळी सुकविण्याचे काम सुरु होते.

यात बोंबील, करंदि, मांदेली, वागटी, जवळा अशा विविध प्रकारची मासळी सुकविण्यासाठी ठेवली जाते. रविवारी संध्याकाळपासूनच वसइ- विरारमध्ये रिमझिम पावसाची सुरुवात झाली होती. रात्रीच्या सुमारास जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे. यामुळे ही मासळी कुजून जाऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.  ही खराब झालेली मासळी बाजारात विक्रीसाठी घेऊनही जाऊ शकत नाही त्यामुळे ही मासळी सर्व फेकून द्यावी लागणार असल्याचे लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. या अवकाळी पावसाचे सावट मागील दोन ते तीन वर्षांपासून अशाच प्रकारे सुरू असल्याने मच्छिमार बांधव हवालदिल झाले आहेत.

नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कोणतीच पावले उचलली जात नसल्याने अशा कठीण परिस्थितीत आम्ही जगायचे  तरी कसे असा प्रश्न मच्छिमार बांधवांनी उपस्थित केला आहे. यासाठी शासनाने आम्हा सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छिमार बांधवांना सुद्धा मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी या बांधवांनी केली आहे.

बाजारात सुक्या मासळीची आवक घटण्याची शक्यता

वसईच्या भागातून सुक्या मासळीला आठवडी बाजार यासह विविध ठिकाणच्या बाजारात मोठी मागणी असते. तसेच वसईच्या भागातून सुक्या मासळीची खरेदी करण्यासाठी नाशिक, घोटी, सोलापूर,  सांगली यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील व्यापारी सुकी मासळी खरेदीसाठी येत असतात. मात्र यावेळी पावसात मोठय़ा प्रमाणात मासळी खराब झाल्याने बाजारात सुक्या मासळीची आवक घटण्याची शक्यता आहे.