वसई: पश्चिम रेल्वे विभागातील वसई रेल्वे स्थानकात बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत मदार जंक्शन – म्हैसूर विशेष ट्रेनच्या दक्षता तपासणीदरम्यान तब्बल ३ लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचा अतिदक्षता विभाग, आरपीएफ, जीआरपी आणि वसई रोड रेल्वे स्थानकावरील वाणिज्यिक अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी मदार जंक्शन – म्हैसूर विशेष ट्रेनची दक्षता तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान ३.२६ लाख रुपये किंमतीचे तंबाखू, पान मसाला, गुटखा उत्पादनांचे जवळपास १८०० पाकिटे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
या प्रतिबंधित वस्तूंच्या अवैध वाहतुकीत सामील असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), अन्न सुरक्षा व मानक कायदा आणि रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही यशस्वी कारवाई ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेला पुढे नेणारी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे नेटवर्कमध्ये चालणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध असून, भविष्यातही अशा कारवाया तीव्र केल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
