वसई: फाऊंटन हॉटेल परिसरातून एक लाख रुपये किंमतीची सोनसाखळी चोरी करून पसार झालेल्या मोहम्मद मोहसीन लईक अहमद अन्सारी (२३) या सराईत सोनसाखळी चोरास गुन्हे प्रकटीकरण कक्ष – ४ च्या पथकाने मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशीतून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील तब्बल १४ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

मुंबई-अहमदाबादवरील फाऊंटन हॉटेल समोरील परिसरातून पायी चालत जात असताना पाठीमागून भरधाव दुचाकीवरून येणारा चोर एका महिलेच्या गळ्यातली दोन तोळे वजनाचे आणि १ लाख ५ हजार किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाला होता. ही घटना १० मार्च रोजी घडली. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या ३०९(६) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४ कडे सोपवण्यात आला होता. घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान आरोपी गोवंडी येथील रहिवासी असून तो मध्यप्रदेशात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले.

मोहम्मद मोहसीन लईक अहमद अन्सारी (२३) असे आरोपीचे नाव असून प्राथमिक तपासात आरोपी विरोधात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पोलीस ठाण्यात मारहाण, जबरी चोरी व घरफोडीचे एकूण १४ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, मनोहर तावरे, संतोष मदने, धनंजय चौधरी, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली.