वसई: वीज ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत असलेले गैरसमज व भीती दूर करण्यासाठी महावितरणने आता थेट जनसंवादाचे हत्यार उपसले आहे. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. यासाठी १६ जुलैपासून सलग ३ दिवस ‘स्मार्ट मीटर जनजागृती मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नालासोपारा नालासोपारा पूर्व उपविभागीय कार्यालयात पार पडणार आहे.
वसई विरार शहरात महावितरणकडून साडेदहा लाखांहून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र, काही ग्राहक मीटरमध्ये फेरबदल करून वीज चोरी करत असल्याचे, तर काही ठिकाणी मीटर सदोष असल्याने अचूक रीडिंग होत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांना नाममात्र बिल जात असल्याने महावितरणला मोठा आर्थिक फटका बसत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि वीज वापरात पारदर्शकता आणण्यासाठी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीला शासकीय आणि औद्योगिक क्षेत्रात हे मीटर बसवल्यानंतर आता घरगुती वीज ग्राहकांकडे मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक वीज ग्राहकांकडून व ग्राहक संघटनेकडून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. याशिवाय स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम निर्माण होत आहेत. हे गैरसमज दूर करून स्मार्ट मीटरचे नेमके फायदे समजावून सांगण्यासाठी या जनसंवाद शिबिरांचे आयोजन करण्यावर महावितरणने भर दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या नालासोपारा उपविभागीय कार्यालयात ३ दिवसीय जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ जुलै या दरम्यान हा मेळावा चालणार असून सकाळी ११ वाजल्यापासून मेळाव्याची सुरुवात केली जाणार आहे.
या मेळाव्यातमहावितरणचे अधिकारी, बिलिंग विभागाचे कर्मचारी आणि स्मार्ट मीटर क्षेत्रातील तज्ज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहतील. ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित जागेवरच निराकरण करण्यासोबतच, स्मार्ट मीटरची अचूक कार्यपद्धती, वीज वापराची पारदर्शक माहिती, बिल तयार होण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध डिजिटल सुविधांची माहिती देऊन ग्राहकांमधील संभ्रम दूर केला जाणार आहे. तसेच वीज बिल, मीटर रीडिंग किंवा जास्त वीज बिल येणे यांसारख्या तक्रारींचेही येथे निवारण केले जाईल अशी माहिती महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांनी दिली आहे.
या मेळाव्याला येताना ग्राहकांनी आपले अद्ययावत वीज बिल, ग्राहक क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. नालासोपारा पूर्व, आचोळे शहर व परिसरातील सर्व वीज ग्राहकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणच्या विरार विभागातर्फे करण्यात आले आहे.
