वसई: वसई विरार शहरात महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविले जात आहे. पण, या शिबिराला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी कामण मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष वेब-लिंकची निर्मिती केली आहे.
वसई विरारच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूलविषयक प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यासाठी जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, उपविभागीय अधिकारी शेखर घाटगे, तहसीलदार दिपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वसई तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविले जात आहे.
अभियानाच्या वेळापत्रकानुसार, मार्च महिन्यात ७ ते १४ तारखेदरम्यान मंडळ स्तरावर शिबिरे होतील. त्यानंतर एप्रिल महिन्यात १० ते १७ तारखेदरम्यान पुन्हा मंडळ स्तरावर आयोजन करण्यात येईल, तर मे महिन्यात ८ आणि १५ तारखेदरम्यान नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर ही शिबिरे घेतली जाणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या एकूण १५ प्रकारच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर पारंपरीक पद्धतीने सुरु असणाऱ्या या शिबिराला आधुनिकतेची जोड देण्यासाठी कामण मंडळाचे तलाठी दत्ता डोईफोडे यांनी https: //magical-crisp-74c0f0.netlify.app/ ही विशेष वेब-लिंक विकसित केले असून, याद्वारे नागरिकांना शिबिराची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
सामान्यतः सरकारी शिबिरांमध्ये कोणते कागदपत्रे लागतात किंवा अर्ज कसा करायचा, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी तलाठी दत्ता डोईफोडे यांनी एका लिंकच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून, त्यामध्ये शिबिराचे वेळापत्रक, ठिकाण आणि दिल्या जाणाऱ्या १५ मोफत महसूल सेवांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या लिंकची वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे, विविध सेवांसाठी अर्ज कसा करावा, याचे मार्गदर्शन व संबंधित विषयावरील अधिक माहितीसाठी युट्युब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
