भाईंदर :-वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीकडे मिरा-भाईंदर महापालिका आणि सत्ताधारी पक्षाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जयंतीदिनी शहरातील महाराणा प्रतापांचा भव्य अश्वारूढ पुतळा ओस पडल्याने महाराणा प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.भाईंदर पूर्वेतील फाटक परिसरात २०२२ साली वीर महाराणा प्रताप यांचा उंच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता.

या पुतळ्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. शहरात मोठ्या प्रमाणावर मारवाडी समाज तसेच महाराणा प्रताप यांना मानणारा समाज राहत असल्याने हा पुतळा उभारण्यात आला होता. दरम्यान, ९ मे रोजी महाराणा प्रताप जयंती होती. यापूर्वी शहरातील महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महापालिकेकडून मानवंदना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

तसेच या अश्वारूढ पुतळ्याची सजावट करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, यंदा प्रशासनाला महाराणा प्रताप जयंतीचाच विसर पडल्याचे चित्र दिसून आले. परिणामी जयंतीदिनी पुतळ्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. शहरातील आमदार नरेंद्र मेहता , महापौर डिंपल मेहता तसेच स्थायी समिती अध्यक्ष हसमुख गेहलोत हे राजस्थानमधील असूनही त्यांनीही जयंतीकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेशी संलग्न काही राजस्थानी संस्थांनी पुतळ्याजवळ छोटेखानी पुष्पहार कार्यक्रम आयोजित केल्याचा दावाही सरनाईक यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांसारख्या महापुरुषांचा वापर येथील राजकीय नेते केवळ राजकारणासाठी करत असून प्रत्यक्षात त्यांच्याबद्दल कोणतीही आस्था नसल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला.