वसई: महाराष्ट्र कृषी विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आकृतीबंधात तांत्रिक कृषी कर्मचाऱ्यांची संख्या कपात करून अतांत्रिक कृषी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर शासनाने भर दिल्यामुळे हा आकृतीबंध रद्द करण्यात यावा व सर्व संबंधित घटकांचा समावेश असलेली सर्वसमावेशक समिती स्थापन करावी, अशी मागणी कृषी विभागातील सर्व तांत्रिक अधिकारी-कर्मचारी संघटना व त्यांच्या महासंघाने केली आहे. या संपात वसई तालुक्यातील कृषी कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या आहेत.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दोन दिवस काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार विविध कार्यालयांबरोबरच प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण संस्थांमध्येही काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास ४ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रस्तावित आकृतीबंधामध्ये उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचे प्रमाण १:७ करण्यात आले आहे. सन १९९८ मध्ये हे प्रमाण १:४, तर २००९ मध्ये १:६ होते. कृषी विभागाचे काम वाढलेले असताना क्षेत्रीय तांत्रिक पर्यवेक्षणाची आवश्यकता वाढण्याऐवजी हे प्रमाण वाढविणे विसंगत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
तसेच ईएचआरएमएस, ई-ऑफिस, ऑनलाइन वेतन प्रणाली, ई-पेमेंट, ऑनलाइन रजा प्रणाली, डिजिटल सेवा पुस्तिका, एमआयएस, डीबीटी आदी प्रणालींमुळे आस्थापना व लेखा विषयक अनेक कामे ऑनलाइन व स्वयंचलित झाली आहेत. तसेच अनुदान प्रक्रियेतील बहुतांश कामे आयुक्तालय स्तरावर केंद्रित झाल्याने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील कार्यालयीन कामाचा भार कमी झाला आहे. असे असतानाही आस्थापना व लेखा संवर्गातील पदांमध्ये वाढ, तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर काम करणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळात कपात करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
त्यामुळे आमचा विरोध शासनाला नसून प्रस्तावित आकृतीबंध तयार करण्याच्या प्रक्रियेला आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचा अनुभव असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा व्यापक सहभाग न घेता आकृतीबंध तयार झाल्याने त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत, अशी भूमिका महासंघाने स्पष्ट केली.
गुणनियंत्रण यंत्रणेचा अभाव:
राज्यात कृषी निविष्ठांचे उत्पादन व मागणी वाढत असताना गुणनियंत्रण यंत्रणेत गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित वाढ झालेली नाही. राज्यात केवळ तीन बियाणे परीक्षण प्रयोगशाळा, दोन पीआरटीएल प्रयोगशाळा आणि पाच खत चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे प्रयोगशाळांमधील मनुष्यबळ कमी करण्याऐवजी वाढविणे आवश्यक असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. गुणवत्तापूर्ण व भेसळमुक्त कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी गुणनियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वसईतील कर्मचारी संख्या:
सहाय्यक कृषि अधिकारी -७
उप कृषि अधिकारी -३
मंडळ कृषि अधिकारी -१
तालुका कृषि अधिकारी -१
