भाईंदर : राज्यातील पशुधनाची डिजिटल नोंदणी, लसीकरण, टॅगिंग आणि पशुपालकांची माहिती एका व्यासपीठावर आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘पशुधन’प्रणालीला काही वर्षांपूर्वी मोठी गती मिळाली होती. पशुसंवर्धन विभागात तत्कालीन सचिव म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या काळात या उपक्रमावर विशेष भर देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर या प्रणालीकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना विभागातील काही कर्मचारी आणि पशुपालकांमध्ये व्यक्त होत आहे.
राज्यात पशुधनाची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, विविध योजनांचा लाभ थेट पशुपालकांपर्यंत पोहोचावा आणि जनावरांच्या आरोग्यविषयक नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पशुधन नोंदणी उपक्रमाला चालना देण्यात आली होती. देशपातळीवरील डिजिटल पशुधन व्यवस्थापन मोहिमेशी संबंधित ऍप आणि पोर्टलद्वारे जनावरांची माहिती संकलित केली जात आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऍप मधील तांत्रिक अडचणी, माहिती अद्ययावत करण्यात होणारा विलंब आणि काही भागांतील नोंदणी प्रक्रियेचा मंदावलेला वेग याबाबत तक्रारी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. काही वापरकर्त्यांनी ऍपच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
विभागातील अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार मुंढे यांच्या (२०२३-२४) कार्यकाळात पशुधनाच्या डिजिटल नोंदींना प्राधान्य देण्यात आले होते. जिल्हानिहाय आढावा बैठका, प्रगतीचा पाठपुरावा आणि उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनावर दबाव ठेवला जात होता. त्यानंतर मात्र या उपक्रमाची धार काहीशी कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत विभागाकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
दरम्यान, पशुपालक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, पशुधन व्यवस्थापनासारखे दीर्घकालीन प्रकल्प व्यक्तीपेक्षा व्यवस्थेवर अवलंबून असतात. त्यामुळे ऍपच्या सुधारणा, नियमित अद्ययावतीकरण आणि तांत्रिक सहाय्य यावर सातत्याने भर देण्याची गरज आहे. अन्यथा पशुधनाची अचूक डिजिटल माहिती तयार करण्याचा उद्देश अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
