भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील संजय गांधी उद्यानातून पावसाळय़ात वाहत जाणाऱ्या पाण्याची साठवून करून धरण उभारण्याचा निर्णय अखेर शासनाकडून घेण्यात आला आहे. याकरिता काशीमिरा येथील वाघेश्वरी मंदिरामागील जागा निश्चित करण्यात आली असून  भविष्यात मीरा-भाईंदर शहराच्या पाणीपुरवठय़ात वाढ  होण्यास मदत होणार आहे. काशिमीरा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारे पावसाचे पाणी हे उद्यानाच्या पायथ्या लगत असलेल्या सखल भागात साठवून ते पाणी वापरायोग्य करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता  पालिकेमार्फत सर्वेक्षण करून पावसाळी पाण्याची साठवणूक होऊ शकेल, अशी पाच ठिकाणे निवडण्यात आली.  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे   आणि स्थानिक आमदार गीता जैन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन  प्रशासकीय दौरा करून जागा निश्चित करण्याचे ठरले. त्यानुसार शुक्रवारी  महानगरपालिकेने सुचविलेल्या वाघेश्वरी मंदिराच्या पाठीमागे सव्‍‌र्हे क्र. २०६ येथील जागेची निवड करण्यात आली.  प्रस्ताव  लवकरात लवकर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक विभागाकडे सादर करण्यात येणार असून वर्षभरात धरण उभारणीचे काम पुर्ण होईल अशी माहिती आमदार गीता जैन यांनी दिली.