वसई: बारावीच्या परीक्षेला मंगळवार पासून सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातील ६९ केंद्रावर ही परीक्षा पार पडणार असून ५६ हजार १३९ इतके विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाने भरारी पथके व बैठी पथके सक्रिय केली आहेत. कॉपी व बोगस प्रकार आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ही शिक्षण विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा १८ मार्च २०२६ पर्यंत परीक्षा चालणार आहे. पालघर जिल्ह्यातील ५६ हजार १३९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून ६९ परीक्षा केंद्र तयार करण्यात आली आहेत. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने ७ भरारी पथके, ५ बैठी पथके नियुक्त केली आहेत.

तर तालुका स्तरावरही गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांचीही विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याद्वारेही परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी २ हजार २४६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाने दिली आहे.

संवेदनशील केंद्रांवरही लक्ष

पालघर जिल्ह्यात ५ संवेदनशील केंद्र आहेत. यातील तीन केंद्र नालासोपारा पूर्वेच्या भागातील असून यात मोरेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज, किशोर मंगलमुर्ती ज्यु. कॉलेज,मदर वेलंकिनी ज्यु. कॉलेज यांचा समावेश आहे. या संवेदनशील केंद्रात कॉपीसारखे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक असल्याने येथे सीसीटीव्ही चित्रण यासह बैठ्या व भरारी पथकांमार्फत लक्ष देऊन गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

नालासोपाऱ्यातील परीक्षा केंद्राची मान्यता रद्द

गेल्यावर्षी मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान नालासोपाऱ्यातील ज्ञानसागर ज्यू. महाविद्यालयात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे यावेळी शिक्षण विभागाकडून या केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात गर्दी करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार, कॉपी आणि गोंधळ रोखण्यासाठी परीक्षेच्या कालावधीत केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स सेंटर्स आणि एसटीडी बुथ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात आणि परिसरात भ्रमध्वनी, स्मार्ट वॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.