भाईंदर :होळीच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. मात्र उत्तरेकडील राज्यांप्रमाणे धुळवडीच्या दिवशीच शासनाकडून सुट्टी देऊन हा सण नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे. त्यामुळे शासनाने ही चूक दुरुस्त करून रंगपंचमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.
रंगपंचमी हा मराठी माणसाचा पारंपरिक सण असून अनेक ठिकाणी धुळवडीनंतर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र अलीकडील काळात रंगपंचमीला सुट्टी नसल्यामुळे नागरिकांना सण साजरा करता येत नाही, अशी खंत समितीने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने होळी पेटल्यानंतर फाल्गुन कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी, म्हणजेच रंगपंचमीला, हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. आजही विविध जिल्ह्यांत याच दिवशी खऱ्या अर्थाने रंग उधळले जातात. याबाबतची नोंद दिनदर्शिकेतही विशेषतः दर्शवण्यात येते.
मात्र गेल्या काही वर्षांत उत्तरेकडील राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमीची सुट्टी देऊन तो दिवस साजरा करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे धुळवडीलाच रंग खेळल्याने मराठी माणूस रंगांचा पारंपरिक सण विसरत चालला आहे. म्हणून शासनाने रंगपंचमीच्या दिवशी अधिकृत सुट्टी जाहीर करून सुमारे १२ कोटी मराठी जनतेच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करावे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी शासनाकडे केली आहे.
धूळवड दिवशी काय करतात
प्रामुख्याने होळी जळवल्यानंतर त्याची मोठी राख शिल्लक राहते. जुन्या परंपरेनुसार हीच राख अंगाला लावून नंतर अंघोळ केली जाते. यामुळे आपल्या शरीरावरील नकारात्मक ऊर्जेचा अंत होत असल्याचा समज आहे. त्यामुळे धुळवड सण साजरा केला जात असला तरी रंगपंचमीला रंगाची उधळण केली जात असल्याचे देखील समितीकडून सांगण्यात आले आहे.
