वसई: महावितरणचे लाईन मन कर्मचारी हे जोखमीचे काम करीत असतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारची अपघाताची घटना घडू नये यासाठी या कर्मचाऱ्यांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन करीत त्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी चारशेहून अधिक कर्मचारी उपस्थित होते.

वसई विरार शहरात महावितरण कडून वीज पुरवठा केला जातो. शहराच्या वाढत्या नागरिकरणामुळे शहरात विजेची मागणी ही अधिक वाढली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेवर अतिभार येऊ लागला आहे.

अशावेळी वितरण व्यवस्थेत तांत्रिक अडचण निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात तर अधिकच वीज समस्या निर्माण होत असतात. वीज समस्या निर्माण झाल्यानंतर त्या दुरुस्तीची कामे शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच खाजगी कर्मचारी करीत असतात.काही वेळा या कर्मचाऱ्यांना वीज संसाधने हाताळण्याची योग्य ती माहिती व त्याचे कौशल्य, दुरुस्तीच्या कामादरम्यान घ्यावयाची काळजी अशी माहिती नसते. त्यामुळे खांबावरून खाली कोसळणे, विजेचा धक्का लागणे यासह इतर अपघाताच्या घटना समोर येत असतात.

अशा घटना टाळण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी महावितरणच्या वसई मुख्यालयाच्या आवारात महावितरणचा लाईनमन दिवस कार्यक्रम पार पडला. यावेळी अधीक्षक अभियंता संजय खंडारे, कार्यकारी अभियंता शैलेश जैन, वसई विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुट्टे, विरार विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश लेले,व चारशेहून अधिक वीज कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना साधनांची हाताळणी, वीज खांबावर चढत असताना घ्यावयाची काळजी, कोण कोणती उपकरणे जवळ असली पाहिजे अशी माहिती देण्यात आली असे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करतात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन शिबीरे, दर आठवड्याला सुरक्षेची प्रतिज्ञा असे उपक्रम घेतले जात आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने ही उपलब्ध करून दिली आहेत.
या वेळी चांगली कामगिरी करणात्या कर्मचाऱ्याचा येथोचित सत्कार करण्यात आला असे संजय खंडारे यांनी सांगितले.