मे २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत

वसई: वसई विरार मध्ये वीज वितरण सुरळीत करण्याच्या दृष्टीने महावितरणकडून उपकेंद्र प्रस्तावित केली होती. अखेर त्या कामांना गती मिळाली असून वसई पोमण आणि विरार चिखल डोंगरी उपकेंद्रासाठी निविदा काढण्यात आल्या असून मे २०२६ पर्यँत कामे पूर्ण केली जाणार आहेत. तर दुसरीकडे कोपरी आणि सुरक्षास्मार्ट सीटी जवळील केंद्राची प्रक्रिया सुरू झाली आहे.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. याशिवाय या भागात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार ही वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत ही वाढ होऊ लागली आहे. वसई विरार विभागातील वीज ग्राहकांची  संख्या सद्यस्थितीत १० लाख ५० हजार इतके वीज ग्राहक आहेत.

यामध्ये घरगुती , वाणिज्य आणि औद्योगिक, कृषी , पथदिवे, पाणी पुरवठा या ग्राहकांचा समावेश आहे. वसईच्या विभागाला साधारणपणे वर्षाला तीन ते साडेतीन हजाराहून अधिक मिलियन युनिट्स इतका वीजपुरवठा केला जात आहे. परंतु आता हळूहळू वीज ग्राहकांची संख्यावाढत आहे. त्यामुळे ज्या उपकेंद्रातून या भागात वीज पुरवठा केला जात आहे.त्या यंत्रणेवरील विजेचा ताण वाढला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार व इतर तांत्रिक अनेक अडचणी निर्माण होत असतात. 

याच अनुषंगाने  महावितरण विभागाने कामण- पोमण, चिखलडोंगरी, कोपरी २२०/ २२ केव्हीची अतिउच्चदाब  उपकेंद्र प्रस्तावित केली होती.

मात्र मागील दोन वर्षांपासून ही उपकेंद्र रखडली होती. वीज वितरणातील वाढती समस्या लक्षात घेता या केंद्राची कामांना गती देण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. अखेर महावितरणने या केंद्राच्या कामाला गती देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. पोमण आणि विरार चिखलडोंगरी येथील उपकेंद्रासाठी निविदा काढल्या आहेत. मे २०२६ पर्यँत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

अन्य तीन उपकेंद्राची प्रक्रिया

दोन उपकेंद्रासाठी  निविदा निघाल्या अजून अन्य तीन ठिकाणी प्रस्तावित असलेल्या उपकेंद्र तयार करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  कोपरी आणि सुरक्षा सीटी अशा ठिकाणी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर सत्पाळा येथे जागा मिळण्यास थोडी अडचण आहे ती सुद्धा दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उपकेंद्र तयार झाल्यास  औद्योगिक क्षेत्रासह सर्वसामान्य वीज ग्राहकांना ही सुरळीत वीज पुरवठा करण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय सद्यस्थितीत जो अतिभार येऊन अडचणी येतात त्या सुद्धा दूर होणार आहेत.

वीज पुरवठा सुरळीत व्हावा व ज्या समस्या आता येत आहेत त्या सुटाव्या यासाठी महावितरणने विविध कामे प्रस्तावित केली होती. ती टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता उपकेंद्राची कामे ही लवकरच मार्गी लागतील.:- संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई