वसई: ज्या ग्राहकांचे वीज मीटर अजूनही जुनेच आहेत, त्यांना महावितरणकडून थेट ४८ तासांचा अल्टिमेटम देणारे पूर्वसूचनेचे संदेश पाठवले जात आहेत. या संदेशामुळे वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. आम्हाला स्मार्ट मीटर नको तर आधी सुरळीत वीज पुरवठा हवा आहे अशी मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे.
महावितरणकडून वसई मंडळाच्या अंतर्गत वसई विरार यासह वाडा मिळून साडे दहा लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. मात्र काही वीज ग्राहक हे मीटर मध्ये फेरबदल करून वीज चोरी करतात. तर काही मीटर सदोष असल्याने त्यांचे गणन योग्य होत नसल्याने काहींना नाममात्र वीज देयक जात होते याचा मोठा आर्थिक तोटा महावितरणला सहन करावा लागतो. अशा प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने महावितरण कडून जुने स्मार्ट मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला शासकीय आस्थापना, औद्योगिक क्षेत्र अशा ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर आता घरगुती वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट लावले जाणार आहे.
अजूनही ज्या वीज ग्राहकांचे वीज मीटर जुनेच आहेत त्यांना महावितरणने व्हाट्सप द्वारे पूर्वसंदेश पाठवून ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. हा संदेश मोबाईलवर येताच वीज ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाल्याने चित्र दिसून येत आहे.
महावितरणचा संदेश काय ?
केंद्र सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर महावितरण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे. हा संदेश तुमचे सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना असल्याचे महावितरणने दिलेल्या संदेशात सांगितले आहे. तसेच स्मार्ट मीटरमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होणार असून, मोबाईल ॲपद्वारे विजेचा वापर व बिलावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होईल. या अंतर्गत ग्राहकांना सौरऊर्जा वेळेत प्रति युनिट ८५ पैशांची विशेष सवलत मिळणार असून, मीटर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्राहकांना केले आहे.
वीज ग्राहकांमध्ये खळबळ
महावितरणचा संदेश मिळाल्यानंतर वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही वीज ग्राहकांनी महावितरणच्या आलेल्या संदेशाला प्रतिउत्तर देत मला स्मार्ट मीटर नको सध्याच्या मीटर विषयी काहीच तक्रार नसल्याचे वीज ग्राहकाने सांगितले आहे. वीज ग्राहकांची याबाबत मागणी नसताना वीज ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा वीज ग्राहकांना कोणताच फायदा होणार नसून उलट खासगी कंपन्यांच्या भल्यासाठी ग्राहकांच्या माथी मीटर मारण्याचे काम करीत असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केला आहे. या प्रकाराबाबत हरकती नोंदविल्या जातील असेही परेरा यांनी सांगितले आहे.
स्मार्ट मीटर ऐवजी स्मार्ट वीज वितरण व्यवस्था द्या
वसई विरार शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. अजूनही येथील वीज वाहिन्या भूमिगत झाली नाही.तर रोहित्र अतिभारीत आहेत, वाहिन्या, विद्युत खांब यांची अवस्था ही बिकट आहे.महावितरणने वीज ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना ‘स्मार्ट मीटर’ऐवजी स्मार्ट वितरण व्यवस्था द्या अशी मागणी वसई वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केली आहे.
