वसई: गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध असलेल्या टकमक किल्ल्यावर वाट चुकलेल्या एका ३७ वर्षीय पर्यटकाची मांडवी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुटका केली. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कांदिवली येथील पर्यटकाचे प्राण वाचले आहे.

विरार रेल्वे स्थानकापासून २२ किलोमीटर अंतरावर सकवार गावापलीकडे टकमक टोक हा किल्ला आहे. शहराच्या नजीक आणि निसर्गरम्य ठिकाणी हा किल्ला वसलेला असल्याने मुंबई, ठाणे, पालघर अशा विविध भागातील पर्यटक, गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमी या किल्ल्याला भेट देत असतात. रविवार, १८ जानेवारी रोजी कांदिवलीत राहणारे द्रविन गजर (३७) हे टकमक किल्ल्यावर एकटेच गिर्यारोहणासाठी गेले होते.

मात्र, ते डोंगराळ भागात गेले आणि रस्ता चुकले. शोधाशोध करूनही परतीचा रस्ता सापडत नसल्याने घाबरलेल्या स्थिती त्यांनी दुपारी ३.३० च्या सुमारास ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना मदतीसाठी साद घातली.

माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विपुल आव्हाळे व अविनाश जांभळकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचतात त्यांनी पर्यटकाची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणी आणि भ्रमणध्वनीला नेटवर्क नसल्यामुळे पर्यटकाशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांना केवळ किल्ल्याच्या पायथ्याशी मोटरसायकल उभी असल्याचे दिसून आले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखवार गावच्या पोलीस पाटील जयश्री पाटील आणि तीन-चार स्थानिक माहिती का तरुणांना सोबत घेऊन शोधमोहीम हाती घेतली. सायंकाळी ७.३० च्या सुमारास संपूर्ण परिसरात अंधार पसरला होता. डोंगराळ भाग आणि वाढत्या अंधारामुळे शोध घेताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. पण, तरीही पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली आणि टकमक किल्ल्यावर अडकून पडलेल्या द्रविन गजर (३७) यांना शोधण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले. बचाव पथकाने त्यांना सुरक्षितरीत्या डोंगराखाली आणले. तसेच यावेळी द्रविन यांनी पोलिसांचे आणि स्थानिक ग्रामस्थांचे आभारही मानले.