भाईंदर: घोडबंदर येथे उभारण्यात येणाऱ्या कांदळवन उद्यानासाठी वन विभाग आणि कांदळवन समितीकडे परवानगीच्या अनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. मात्र अद्यापही परवानगी न मिळाल्यामुळे काम सुरू करण्यात आलेले नाही.
मिरा-भाईंदर हे शहर खाडीकिनारी वसलेले आहे. त्यामुळे येथील मोठा परिसर खारफुटी क्षेत्रात मोडतो. निसर्ग संतुलनासाठी या खारफुटी क्षेत्राचे संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच केंद्र शासनाने कडक नियम तयार करून हे क्षेत्र संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
या क्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टीने वापर करण्याच्या हेतूने कांदळवन उद्यान उभारण्याची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार घोडबंदर येथील कांदळवन क्षेत्र महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात कांदळवन उद्यानासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही झाडाला धक्का न पोहोचवता हे उद्यान महापालिकेमार्फत उभारले जाणार आहे. मात्र त्याआधी महापालिकेला वन विभाग आणि केंद्र शासनाच्या सीआरझेड विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
समिती कडून पाहणी
घोडबंदर भागात कांदळवन उद्यान उभारण्यासाठी महापालिकेने चेन्नई येथील आयआरएस संस्थेकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार संस्थेच्या समितीने नुकतीच या परिसराची पाहणी केली आहे. त्यानंतर समितीकडून महापालिकेला मॅपिंग मिळाल्यानंतरच काम हाती घेतले जाईल, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रयोग फसण्याची भीती
राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी खाडीकिनारी असलेल्या कांदळवन क्षेत्राचे संरक्षण करून तेथे पर्यटन क्षेत्र विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यासाठी आवश्यक निधीही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला होता. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले होते. मात्र मुंबई महानगर क्षेत्रात हा प्रयोग फसल्याचे आता समोर आले आहे.खाडीत साचलेल्या दूषित पाण्यामुळे कांदळवन परिसरातील जैवविविधता नष्ट झाल्याचा अहवाल पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे. तसेच कांदळवन क्षेत्रात काँक्रीट किंवा सिमेंटऐवजी लाकडी रचनेचे बांधकाम करणे बंधनकारक असल्यामुळे लोकप्रतिनिधी या ठिकाणाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका वनशक्ती संस्थेचे संस्थापक स्टॅलिन डी. यांनी केली आहे.
