भाईंदर :- मिरा भाईंदरासाठी महाविकास आघाडीतर्फे तयार करण्यात आलेला निवडणूक जाहीरनामा शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शहरातील विविध समस्या सोडविण्याबरोबर विकास कामांचा उल्लेख या जाहिरनाम्यात करण्यात आला आहे.
मिरा भाईंदर मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हुसेन यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मिरा रोडच्या सेंटर पार्क मैदानात विशेष जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
हेही वाचा – वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
शहरातील विविध समस्या सोडविण्याबरोबर विकासाचे नियोजन करणारा जाहिरनामा तयार करण्यात आला आहे. यात शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर करणे, आरोग्य सेवा बळकट करणे, मेट्रो सेवा सुरु करणे, जुन्या इमारतीचा विकास करण्यासाठी धोरण निश्चित करणे, शिक्षण क्षेत्राला बळकटी देणे, रोजगारासाठी लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे, दिवाणी न्यायालय उभारणे, पोलीस मुख्यालय उभारणे मिरा रोड-भाईंदर स्थानकावर लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी रेल्वे टर्मिनस उभारणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
यावेळी खासदार अनिल देसाई यांनी आपल्या भाषणात भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका केली. भाजप नेत्यांच्या धोरणात आणि प्रत्यक्ष कृतीत मोठे अंतर असल्याचे ते म्हणाले. शहरात भाजपची सत्ता आल्यानंतर शहराचा बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे शहरात खराब रस्ते आणि पाण्याची समस्या भेडसावत असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात मुझफ्फर हुसेन यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या काही वर्षात झपाट्याने विकसित झालेल्या मिरा रोड शहराच्या विकासात हुसेन परिवाराचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. सर्वत्र द्वेष पसरवला जात असताना हुसेन यांनी शहरात मानवता धर्म टिकवला असल्याचे त्यांनी सांगितले. मी ४ दशके राजकारणात आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. त्यामुळे धार्मिक मुद्द्यांच्या आधारे दिशाभूल करणारे राजकारण केले जात असल्याचे मुझफ्फर हुसेन यांनी सांगितले.