वसई: वसईतील माणिकपूर परिसरात लोंबकळणारी जिवंत विद्युतवाहिनी अखेर हटविण्यात आली आहे. महावितरणने दिलेल्या पत्रानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने ही वीजवाहिनी काढून टाकली. वसई पश्चिमेतील माणिकपूर येथे गवणीघर परिसर आहे. या परिसरात असणाऱ्या दुकानाच्या नजीक अधांतरी बांबू उभारून या बांबूच्या आधारे वीजपेटीतून नजीकच्या परिसरात वीजजोडणी देण्यात आली होती.

सध्या शहरात मुसळधार पाऊस पडत असून त्याचबरोबर वेगाने वारे देखील वाहत असतात. सोसाट्याचा वारा वाहत असताना जिवंत वीजवाहिनी अचानक रस्त्यावर पडल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. गुरुवारी यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल महावितरणच्या वसई शाखेतील सहाय्यक अभियंता दिनेश चौधरी यांनी माणिकपूर चौकात जाऊन वीज वाहिन्यांची तपासणी केली. यावेळी वसई विरार महापालिकेच्या विद्युत विभागाने भूमीगत वीज वाहिनीत बिघाड झाल्याने बांबूच्या मदतीने पथदिव्यांना वीजपुरवठा सुरू केला असल्याची बाब चौकशीत समोर आली.

त्यानंतर महावितरणने यासंबंधी महापालिकेच्या विद्युत विभागाला पत्र पाठवल्यानंतर बांबूच्या आधारे लोंबकळणारी वीजवाहिनी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकली आहे. पालिकेने केलेल्या या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.