वसई: वसई पश्चिमेतील नवघर आगार परिसरातील वेश्या व्यवसायाला चाप बसावा म्हणून माणिकपूर पोलिसांकडून या भागात चौकी उभारण्यात आली आहे. पण, ही पोलीस चौकी सतत बंद असल्यामुळे आता थेट चौकीसमोरच वेश्ययांचा वावर असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वसई पश्चिमेला नवघर बस आगार आहे. या आगारात पालिका व एसटी महामंडळाच्या बसेस लागत असल्यामुळे तसेच हा परिसर थेट वसई रेल्वे स्थानकाला जोडला गेला असल्यामुळे येथे प्रवाशांची ये-जा असते. मात्र, संध्याकाळच्या सुमारास आगारातील गर्दी ओसरल्यावर देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिला आगाराचा परिसर व्यापू लागतात. यामुळे या भागातून रात्री-अपरात्री कामावरून परतणाऱ्या महिला व मुलींना हा प्रवास करणे असुरक्षित वाटू लागले होते.

तसेच नवघर बस आगारात गर्दुल्ले व मद्यापींची वाढणारी गर्दी, रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पानटपऱ्या यामुळे हा परिसर रात्रीचा अतिशय असुरक्षित बनला होता. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी चौकी उभारावी किंवा गस्त घालून देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत माणिकपूर पोलिसांनी गेल्यावर्षी बस आगारात एक चौकी उभारली.

या चौकीमुळे आणि पोलिसांच्या धाकामुळे या भागातील वेश्या व्यवसायाला चाप बसेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, चौकी सुरू होऊनही परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेली ही चौकी अनेकदा बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे सुरुवातीला काहीकाळ दिलासा मिळाला असला तरी आता पोलीस चौकी सतत बंद असल्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला थेट पोलीस चौकीसमोरच वावरू लागल्या आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व चौकी सुरू करण्याच्या एकंदरीत उद्देशावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याबाबत परिमंडळ-२ चे पोलीस उप आयुक्त अशोक वीरकर यांच्याशी संपर्क साधला असता, चौकीची पाहणी करून ती सुरू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.