वसई: वसई तालुक्यातील कामण गावात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलेल्या प्रथमेश परब या मराठी अभिनेत्याची कार चिखलात रुतून बसली होती. पण, गावातील लहान मुले आणि तरुणांनी केलेल्या मदतीमुळे अभिनेत्याची कार अखेर चिखलातून बाहेर काढण्यात आली असून या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने या तरुणांचे कौतुक केले आहे.
वसई तालुक्यातील पूर्व परिसरात कामण हे गाव वसलेले आहे. शहरी भागापासून लांब आणि महामार्गापासून जवळ असलेल्या या परिसरात आजपर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रविवारी अशाच एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी टाईमपास चित्रपट फेम प्रथमेश परब वसईत आला होता.
चित्रीकरण पूर्ण करून घरी जात असताना कामण येथे त्याची कार चिखलात रुतली. बरेच प्रयत्न करून देखील कार न निघाली नाही. शेवटी गावातील लहान मुलं आणि तरुण त्याच्या मदतीला धावून आहे. त्यांनी त्याच्या कारला धक्का देत चिखलातून त्याची कार बाहेर काढली.
अभिनेता प्रथमेश परब याने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्याची मदत करणाऱ्या कामण गावातील तरुणांचे त्याने आभारही या व्हिडिओच्या माध्यमातून मानले आहेत.
