भाईंदर :-आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांनी मातृभाषा नोंदविताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आले आहे. २०११ च्या जनगणनेत अनेकांनी अनावधानाने इतर भाषांची नोंद केल्याने मराठी भाषेचे प्रमाण चुकीच्या पद्धतीने दर्शवले गेले होते. ही चूक यावेळी टाळण्याची गरज असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी जनगणनेतील ‘मातृभाषा’ या घटकात केवळ ‘मराठी’ अशीच नोंद करावी. तसेच इतर अवगत भाषांमध्ये आवश्यकतेनुसार ‘इंग्रजी ‘किंवा इतर भाषांचा उल्लेख करता येईल.मात्र, बोलण्यात येते म्हणून ‘हिंदी’भाषेची नोंद टाळावी, असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे. ल२०११ च्या जनगणनेदरम्यान अनेक मराठी भाषिकांनी सवयीने किंवा चुकीच्या समजुतीतून इतर भाषांची नोंद केल्यामुळे राज्यातील भाषिक आकडेवारीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे मराठी भाषिकांची वास्तविक संख्या कमी भासल्याचे दिसून आले.
प्रामुख्याने राज्याची अधिकृत आकडेवारी ही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिबिंब असल्याने यावेळी प्रत्येक नागरिकाने सजगपणे माहिती द्यावी, असेही आवाहन समिती चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पत्रक काढून केले आहे.
जनगणनेत भाषेचे महत्व काय?
जनगणनेत भाषेची नोंद करणे हे केवळ औपचारिक काम नसून त्यामागे अनेक महत्त्वाचे उद्देश असतात. यातूनच शासनाला धोरण आखण्याचा आधार मिळतो.यात प्रामुख्याने शैक्षणिक नियोजन,सरकारी सेवा आणि प्रशासन कामकाज धोरण,भाषिक हक्क आणि धोरणे,संसाधनांचे वाटप,संशोधन आणि विकास, ओळख आणि सांस्कृतिक जतन याचा समावेश आहे. त्यामुळे जनगणनेत भाषेची अचूक नोंद करणे म्हणजे केवळ वैयक्तिक माहिती देणे नाही, तर भविष्यातील धोरणांवर प्रभाव टाकणे आहे.
