भाईंदर : मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचा ११ वा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मीरा रोड येथील स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात ‘शिलेदार मेळावा २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थितीत होते.
या कार्यक्रमात संघटनेच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. मराठी भाषा, संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी सुरू असलेली चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीचे संकल्प, नव्या उपक्रमांची घोषणा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिलेदारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, पुढील कार्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या वर्षात संघटनेचे कार्य अधिक जोमाने पुढे जावो, मराठी हक्कांची लढाई अधिक व्यापक होवो आणि बहुसंख्य मराठी समाजाचे एकीकरण घडो, हीच अपेक्षा आहे. संघटना राज्यभर विस्तारत असून चळवळ अधिक बळकट होत असल्याचा आनंद आहे. ही मराठी अस्मितेची लढाई सर्वसामान्य मराठी माणसाची असून, सर्वांनी एकजुटीने या चळवळीत सहभागी व्हावे,” असे आवाहन केले.
